औरंगाबाद : हंगामाच्या सुरवातीचा एक महिना (Marathwada) मराठवाड्यावर वरुणराजाची अवकृपा राहिलेली होती. त्यामुळे पाणीसाठ्यातील वाढ तर सोडाच पण (Kharif Sowing) खरिपातील पेरण्या देखील होतील की नाही अशी स्थिती होती. मात्र, गेल्या 10 दिवसांमध्येच संपूर्ण चित्र बदलले आहे. पावसाची हजेरी आणि रखडलेल्या खरिपातील पेरण्या आणि आता नुकसानही. सर्वकाही गेल्या 10 ते 12 दिवसांमध्ये झाले आहे. विशेष म्हणजे (Godavari River) गोदावरी नदीला पूरही या 10 दिवसांमधील पावसाने आला आहे. गोदावरी सध्या दुथडी भरुन वाहत आहे. गतवर्षीही अशीच स्थिती ओढावली होती पण परतीच्या पावसाने. यंदा जुलै महिन्यातच ही स्थिती ओढावली आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार याची धास्ती आतापासूनच लागली आहे. विभागातील आठही जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे पेरणी झालेले क्षेत्र आणि न झालेले क्षेत्रही धोक्यात आहे.
गोदावरी नदीला पूर आला की या नदीतील पाणी पुढे जायकवाडी धरणात साठते. गतवर्षीही परतीच्या पावसाच्या दरम्यान जायकवाडी धरण हे ओव्हरफ्लो झाले होते. गेल्या 10 दिवसांमध्ये मराठावाड्यातील पाणी पातळीत वाढ तर झालीच आहे पण आता जलसाठे तूडुंब भरुन वाहत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागत आहे. गतवर्षी सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने पाणी टंचाई तशी जाणवलीच नाही. तर आता 10 दिवसांतील पावसाने चित्रच बदलले आहे. गोदावरी नदीचे पाणी थेट धरणात येऊ लागल्याने धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होत आहे.
सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. शिवाय यंदा प्रतिकूल परस्थिती आणि पेरणीस उशीर होऊनदेखील शेतकऱ्यांनी सोयाबीनवरच भर दिला आहे. शिवाय पेरणीनंतर झालेल्या पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ होईल अशी स्वप्ने शेतकरी रंगवत होते. मात्र, पेरणी होताच सुरु झालेला पाऊस हा गेल्या 8 दिवसांपासून कायम आहे. त्यामुळे अधिकच्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, उडीद, मूग या पिकांना धोका निर्माण झाला आहे. पावसाने आता उघडीप दिली नाहीतर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देखील दुबार पेरणीच करावी लागणार आहे. त्यामुळे उत्पादनावर आणि संपूर्ण खरीप हंगामावर परिणाम होईल असा अंदाज आहे.
गोदावरी नदीला तर पूर आला आहेच पण गावालगतच्या लहान-मोठ्या नद्याही ओव्हरफ्लो झाल्या आहेत. नदीला लागलीच पाणी आल्याने अनेक ठिकाणची पुलावरुन होणारी वाहतूक ठप्प आहे. नदी, नाले, ओढे हे तुडूंब भरले आहेत. केवळ 12 दिवसांमध्ये हे चित्र बदलले आहे. गोदावरी नदी ही दुथडी भरुन वाहण्यास सुरवात झाली आहे. डोमगाव परिसरात पुलावरुन पाणी आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणी पातळीत वाढ होत असून मराठवाड्यात देखील सर्वत्र पाणीच पाणी अशी स्थिती झाली आहे.