वादळी वाऱ्यासह पावसाने या जिल्ह्यात मोठं नुकसान, शेतातील रब्बी ज्वारी पिकासह इतर पिके जमीनदोस्त

| Updated on: Mar 07, 2023 | 3:30 PM

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसत आहे. पिके जमीनदोस्त होत आहेत.

वादळी वाऱ्यासह पावसाने या जिल्ह्यात मोठं नुकसान, शेतातील रब्बी ज्वारी पिकासह इतर पिके जमीनदोस्त
Follow us on

बुलढाणा : गेल्या दोन दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या गडगडाटात अवकाळी पाऊस पडत आहे. याचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसत आहे. पिके जमीनदोस्त होत आहेत. रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील आत्माराम कापरे यांच्या अडीच एकरातील ज्वारीचे पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले. या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

गहू, हरभरा जमीनदोस्त

रात्री पडलेल्या पावसाने बुलढाणा जिल्ह्यातील प्रामुख्याने जळगाव जामोद, संग्रामपूर, वरवट बकाल, सोनाळा, लाडनापुर या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, हरभरा, ज्वारी ही पिके जमीनदोस्त झालीत. झाडांची संत्री जमीनीवर पडली आहेत. यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. वादळी वाऱ्याने गहू भूसपाट झाला आहे. संत्रा गळून पडला आहे. झाडाखाली संत्र्याचा सडा पाहायला मिळतो. खाली पडल्यामुळे असा संत्रा लवकर खराब होतो. या नुकसानीमुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. गहू, हरभरा तसेच ज्वारीचे पीकही जमीनदोस्त झाले आहे. हिरवेगार ज्वारीचे दांडे खाली झोपल्यागत दिसत आहेत. शेकडो एकर शेतातील पिकावर या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

पिकासह संत्रा बागेचे मोठे नुकसान

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात रात्री वाशीमसह कारंजा, मानोरा, रिसोड आणि तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बीतील काढणीला आलेल्या गहू, हरभरा, पिकांसह भाजीपाला आणि संत्रा बागेच अतोनात नुकसान झाले. सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. अजूनही ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.