नंदूरबार : मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात शेतात काम करणाऱ्या (Farm Worker) सालगड्याची निवड ही गुढीपाडव्याचे मुहूर्त साधून केली जाते. तर खान्देशात (Akshaya Tritiya) अक्षय तृतीयेचे मुहूर्त साधले जाते. पण (Khandesh) खान्देशात सालगडी निवडण्याची प्रक्रिया ही रंजक आहे. ज्याप्रमाणे एखाद्या कंपनीमध्ये नौकरी करण्यासाठी तरुणाची कुवत तपासली जाते अगदी त्याप्रमाणेच सालगडीसाठी इच्छूक असलेल्याची जणूकाही परीक्षाच घेतली जाते. प्रत्येक भागात सालदार निवड करण्याची वेगळी पद्धत असते मात्र नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात सालगडी ठरविण्याची वेगळी पद्धत वर्षोनावर्षं जोपसली जात आहे. वर्षासाठीची रक्कम ठरवून सालगड्याकडून शेती कामे करुन घेतली जातात.
वर्षभर राबणाऱ्या गड्याची नियुक्ती करताना वर्ष भराचा पगार म्हणजे साल ठरविण्यासाठी अक्षय तृतीयेच्या मुहूर्त निवडला जातो. गड्याचं साल ठरविताना त्याची ताकद आणि चिकाटी पहिली जाते. ही परंपरा आजही माळीवाडा परिसरात कायम आहे. या गड्याची निवड करण्यासाठी या भागातील चौकात असेल्या दोन मोठ्या दगडांची पूजा केली जाते त्यानंतर त्या ठिकाणी आलेले तरुण या दगडांना उचलण्याचा प्रयत्न करतात. जे तरुण हे गोटे उचलतात त्याची सालगडी म्हणून निवड होते.
सालगड्यासाठी जे नियम-अटी ठरवून दिलेल्या आहेत त्या पूर्ण केल्यानंतर प्रश्न असतो तो वर्षभराच्या पगाराचा. सालगड्याची परीश्रम करण्याची तयारी पाहून साल ठरविले जाते. यावर्षी सालदारांचे वर्षभराचे पॅकेज 60 हजारा पासून ते 1लाख 10 हजार रुपया पर्यत ठरत आहे त्याच सोबत त्याला कपड्याचे 2 जोड आणि 2 पोते धान्य दिले जाते. माळी वाडा परिसरात ही शकंडो वर्षांपासून सुरू असलेली परंपरा टिकून आहे. शिवाय घेतलेली जबाबदारी ही सालगड्याला टाळता येत नाही. यासाठी गावचे ग्रामस्थ उपस्थित असताना निवड केली जाते.
खान्देशातील माळीवाडा परिसरात आजही पांरपरिक पध्दतीने सालगडी ठेवण्याची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामागचा हेतूही चांगला होता. पण पूर्वी तरुणांच्या हाताला काम नव्हते. शिवाय शेती नसल्याने अन्न-धान्याचा प्रश्न असायचा त्यामुळे पैसे आणि धान्यही मिळत असल्याने वर्षभर काम करण्याची तरुणांची तयारी असायची. आता तो उत्साह किंवा गरज राहिलेली नाही. त्यामुळे काही भागात तर सालगडी ही परंपराच उरलेली नाही. मात्र, खान्देशातील काही भागात आजही टिकवून ठेवण्यात आली आहे.