मालेगाव : सध्या जो तो कामाच्या शोधात आहे. हाताला काम मिळावे म्हणून शर्तीचे प्रयत्न केले जातात. पण (Nashik) नाशिक जिल्ह्यातील करंजाड उपबाजार (Market Committee) समितीसाठी नवीन भरती केलेल्या (Worker) हमाल व मापाड्यांना तात्काळ कामावरून कमी करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सटाणा येथील सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर शुक्रवारपासून उपोषण सुरू केले आहे. या कामगारांची भरती ही नियमबाह्य असून त्याचा अन्य कामगारांवर परिणाम होतो म्हणून माथाडी संघटनाही आक्रमक झाली आहे. शिवाय सहकार मंत्र्यांच्या आदेशालाही बाजार समितीच्या सचिवांनी केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
नामपूर बाजार समितीने करंजाड उपबाजार समितीसाठी नवीन कामगारांची भरती करण्यात आलेली आहे. त्यामुळे जुन्या कामगारांवर अन्याय होणार आहे. नव्याने भरती केलेल्या हमाल व मापाड्यांना कामावरुन कमी करावे असे आदेश राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत. असे असताना त्यांच्या आदेशाची अंलमबजावणी केली जात नाही. शिवाय या नव्या कामगारांना कमी केल्याचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आला आहे. त्यामुळे संतप्त कामगारांनी सटाणा येथील सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर शुक्रवारपासून उपोषण सुरू केले आहे.
नव्याने भरती करण्यामागे बाजार समितीचे काही आर्थिक हीत जोपासले गेले आहे का असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. जुने कामगार असताना बाजार समितीला नव्या कामगारांचा अट्टाहास का ? असे एक ना अनेक सवाल उपस्थित करीत हे आंदोलन कऱण्यात आले आहे. जिल्हा निंबधक कार्यालयाचे लक्ष वेधून घेण्यासाठी या कर्माचाऱ्यांनी सटाणा येथे आंदोलनाला सुरवात केली आहे. योग्य निर्णय झाल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही.
करंजाड उपबाजार समितीमध्ये नव्याने हमाल आणि मापाडी यांची भरती झाली तर इतर जुन्या कामगारांच्या हाताला काम मिळणार नाही. शिवाय ही भरती रद्द करण्याचे आदेश असताना बाजार समिती प्रशासन मनमानी कारभार करीत आहे. त्यामुळे कारवाई झाली तरच माघार अशी भूमिका आता कामगारांनी घेतली आहे. या उपोषणाला माथाडी कामगार संघटनेचे नाशिक जिल्हा सरचिटणीस सुनील यादव यांच्यासह सटाणा बाजार समितीमधील हमाल मापाऱ्यांनी पाठिंबा जाहीर
केला आहे.