चंद्रपूर : (Agricultural goods) शेतीमालाची उत्पादकता किती काढायची हे शेतकऱ्यांच्या नियोजनावर आणि अथक परिश्रमावर अवलंबून असले तरी शेतीमालाचे दर शेतकऱ्यांना ठरविता येत नाही. त्यामुळे (Production) उत्पादनात कमी-अधिकपणा झाला तरी नेमके उत्पन्न किती मिळणार हे शेतकऱ्यांनाही सांगता येत नाही. पण काळाच्या ओघात (Market) मार्केटचा अचूक अंदाज आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून उभारले जात असलेले मार्केट शेतकऱ्यांसाठी नवी आशा घेऊन येत आहे. चंद्रपुरात तर शेतकरी उत्पादित मॉलची सुरवात देखील झाली असून यामाध्यमातून शेतीमालाची विक्री देखील सुरु झाली आहे. शहरातील तुकूम भागात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते हे मॉल सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे पीक पध्दतीमध्ये बदल करुन केवळ उत्पादनच वाढवले जाणार नाही तर आता उत्पादित झालेल्या मालाला चांगली बाजारपेठे मिळवून देण्याचा प्रयत्न हा शेतकऱ्यांचा राहणार आहे.
विकेल तेच पिकेल या योजनेच्या मागे शेतकऱ्यांना उत्पादनाबरोबर बाजारपेठेचाही अभ्यास व्हावा हाच उद्देश होता. तो आता प्रत्यक्षात साध्य होताना पाहवयास मिळत आहे. कारण चंद्रपुरातील तुकूम भागात शेतकरी उत्पादित मॉलची सुरवात झाली आहे. यामध्ये तांदूळ, हरभरा, हळद आणि तिखटसह विविध धान्यही देखील विक्रीसाठी आहेत. शेतीमालासाठी असे मॉल नव्यानेच झाले असून आता या ठिकाणी विषमुक्त उत्पादने विक्रीची सुवर्ण संधी राहणार आहे. शिवाय सर्वसामान्य नागरिकांनाही एकाच छताखाल सर्वकाही मिळणार आहे.
चंद्रपूर शहरात तर शेतीमालाचे मॉल उभारण्यात आले आहे. शिवाय आता जिल्हाभरातील तालुक्याच्या ठिकाणी आणि इतर लहान मोठ्या शहरामध्येही शेतकरी उत्पादन कंपनीच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाणार आहे. जिल्ह्यातील विविध तालुका ठिकाणी व मोठ्या गावांमध्ये अशा प्रकारे बाजारपेठ निर्मितीची संकल्पना, चंद्रपूर जिल्ह्यात येत्या काळात गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचे पाणी सर्वदूर पोहोचणार असल्याने अशा शेतकरी उत्पादित कंपन्यांची स्थापना करुन जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात आगामी काळात गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचे पाणी सर्वदूर पोहचणार आहे. त्यामुळे शेतकरी उत्पादन कंपन्या उभारण्यास पोषक वातावरण निर्माण होणार असून या माध्यमातून शेती मालाला आधारभूत किंमत देण्याचा प्रयत्न राहणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला स्थानिक पातळीवर योग्य दर मिळाला तर दुहेरी फायदा होणार आहे. ना माल वाहतूकीचा खर्च ना दरात कमी अधिक करण्याचा धोका. त्यामुळे शेतकरी उत्पादित कंपन्या ह्या बाजार समितीचीच भूमिका निभावणार आहेत हे मात्र नक्की.