औरंगाबाद : जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून (Marathwada) मराठवाड्यासह राज्यात पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे काही प्रमाणात नुकसान हे झालेच आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून (Rain) पावसाचा जोर कमी झाला आहे. संपूर्ण पाऊस गायब झाला नसला तरी प्रमाण कमी झाल्याने (Kharif Season) खरिपातील पिकांबाबत शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. असे असले तरी पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार आहे तर 22 आणि 23 जुलै रोजी मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांना रखडलेली शेती कामे तर करता येणार आहेतच पण पिके वाचवण्यासाठीही विशेष असे प्रयत्न करावे लागणार आहेत.
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने मराठवाड्यात पुढील 5 दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पावसाचा धोका टळला असला तरी या वातावरणामुळे पिकांवर किड-रोगराईचा प्रादुर्भाव वाढणार आहे. शिवाय आगोदरच शंकू गोगलगायीने पिके फस्त करण्याचा धडाका सुरु केला आहे. शिवाय आता ढगाळ वातावरणामुळे किडी बरोबरच पिकांमधील तणही वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या मशागती बरोबरच पीक फवारणीही करावी लागणार आहे.
गेल्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस हा नांदेड जिल्ह्यामध्ये झाला आहे तर त्या पोठोपाठ हिंगोलीमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. आता पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार असले तरी 22 आणि 23 जुलै रोजी याच दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरम्यानच्या चार दिवसांमध्येच शेतकऱ्यांना शेतीकामे उरकून घ्यावी लागणार आहेत. शिवाय 23 ते 28 दरम्यानच्या काळात मराठवाड्यात सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
पेरणी झालेल्या क्षेत्रात पाणी साचून राहणार नाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधाकडून चर खोदावी लागणार आहे. त्यामाध्यमातून साठलेले पाणी वावराबाहेर काढले तरी सोयाबीन हे पिवळे पडणार नाही. शिवाय आणखी पाऊस झाला तरी चारीद्वारे पाणी वावराबाहेर येईल. वाफसा होताच सुक्ष्म मुलद्रव्ये व रस शोषण करणाऱ्यां किटकांसाठीची फवारणी करणे गरजेचे असल्याचे लातूरचे कृषी उपविभागीय अधिकारी कदम यांनी सांगितले आहे.