नंदूरबार | जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यावर्षी कापसाची लागवड (Cotton Cultivation) होणार आहे. कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने (Agriculture Department) यापूर्वी वर्तवला होता. त्यानुसार, जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 10 हजार 760 हेक्टर क्षेत्रावर (Area) कापसाची लागवड पूर्ण झाली आहे. अजूनही कापसाची लागवड सुरू असल्याने हे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. मागील वर्षी कापसाला मिळालेला सर्वाधिक भाव तसेच यावर्षीही कापसाला चांगला भाव (Price) मिळेल असा विश्वास शेतकऱ्यांना असल्याने कापूस लागवडीला प्राधान्य देण्यात आले आहे. या खरीप हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत 76 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. त्यात सर्वाधिक पेरणी कापसाची झाली आहे. जिल्ह्यात एकूण पीक निहाय विचार केल्यास कापसाच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येते. एकूण पीकनिहाय सरासरी पाहता सोयाबीन 92.82 टक्के आणि कापूस 95.85 टक्के लागवड करण्यात आली आहे. त्या खालोखाल जिल्ह्यात तूरीचे क्षेत्र आहे.
जून महिन्यात तडी दिल्यानंतर राज्यभर पावसाने कोसळधार सुरुवात केली. विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाने घोंगडी टाकली. त्यामुळे नदी नाल्यांना पुर आला. जनजीवन विस्कळीत झाले. पंरतू शेतीसाठी हा पाऊस समाधानकारक ठरला. बहुतांश शेतकऱ्यांनी खरीपाची पेरण्यांची लगबग केली. त्यांच्या पिकांसाठी हा पाऊस फायद्याचा ठरला आहे. नंदूरबार जिल्ह्यात जून महिन्यात पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या होत्या. शेतकऱ्यांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षा होती. गेल्या आठवडाभरापासून झालेल्या दमदार पावसामुळं पेरण्यांना वेग आला आहे. नंदूरबार जिल्ह्यात यंदा 3 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते,पैकी 2 लाख 28 हजार 280 क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. लवकरच पेरणी योग्य क्षेत्र लागवडी खाली येण्याची शक्यता आहे.
नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामातील दोन लाख 28 हजार 280 क्षेत्रावर पेरणी झाली असून पेरणीची सरासरी 76.09 टक्के एवढी आहे. यामध्ये सोयाबीनचा पेरा 25 हजार 326 हेक्टरवर झाला आहे. ज्वारी 17 हजार 870 क्षेत्रावर पेरण्यात आली आहे. मका 22 हजार 669 हेक्टरवर पेरण्यात आली आहे. कापासाचा पेरा हा 1 लाख 10 हजार 760 झाला. भात 14 हजार 189 हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर तुरीची लागवड 11 हजार 167 क्षेत्रावर करण्यात आली आहे. एकूण पीकनिहाय सरासरी पाहता सोयाबीन 92.82 टक्के आणि कापूस 95.85 टक्के लागवड करण्यात आली आहे. त्या खालोखाल जिल्ह्यात तूरीचे क्षेत्र आहे.