वाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यातील अनेक संत्रा (santra cultivation) बागांवरील ‘लाल्या’ रोगाच्या प्रादुर्भावामुळं झाडावरील 60 ते 70 टक्के फळं लाल,काळी पडल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. संत्रा फळबाग खरेदीकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरविल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. या नुकसान ग्रस्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून दिलासा देण्याची मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी (washim farmer) केली आहे. राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या बागांचं नुकसान झालं आहे. शेतकरी मागच्या कित्येक दिवसांपासून सरकारने पाहणी कसून पंचनामे करावे अशी ओरड करीत आहे. परंतु अद्यात त्यांच्या दुर्लक्ष झाल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
वाशिम जिल्ह्यात मागील 10 वर्षांमध्ये संत्रा बागांचं क्षेत्र 20 पट वाढलंय. 9791 हेक्टर वर संत्रा फळबागांची लागवड करण्यात आली आहे. दरवर्षी संत्रा फळ बागांमधून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळतंय. यंदा मात्र यातील अनेक संत्रा फळबागांवर ‘लाल्या’ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. संत्रा फळांनी लदबदलेल्या झाडावरील 60 ते 70 टक्के फळं लाल, काळी पडली असून अनेक फळं खाली गळून पडत आहेत. या संत्रा फळबागा खरेदीकडं व्यापाऱ्यांनी पाठ फिरविल्यानं या फळबागा विना तोडणीच्या जशाच्या तशा पडून आहेत.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागच्या आठदिवसांपासून अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह झोडपून काढले आहे. त्याचा परिणाम रब्बी हंगामावरती झाला आहे. त्याचबरोबर फळबागांवरती सुध्दा झाला आहे. लाखो रुपयांचं नुकसान झाल्यामुळे नेमकं काय करावं ? अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.