जालना : एकीकडे खरीप हंगामासाठी (Chemical Fertilizer) रासायनिक खताचा तुटवडा भासणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे रासायनिक खताचाच वापर कमी करण्याचे धोरण (Agricultural Department) कृषी विभागाकडून राबवले जात आहे. रासायनिक खताची मात्रा अचानक तर बंद करता येणार नाही पण टप्प्याटप्प्याने त्याअनुशंगाने पावले उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून (Jalna) जालना कृषी विभागाने यंदाच्या वर्षापासून चांगला उपक्रम हाती घेतला आहे. दरवर्षी खरिपाच्या एकूण क्षेत्रापैकी किमान 10 टक्के क्षेत्रावर रासायनिक खताचा वापर करायचा नाही तर शेतकऱ्यांना वेगवेगळे पर्याय उपलब्ध करुन देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.
रासायनिक खताच्या वापराचा दुष्परिणाम असला तरी लागलीच याची मात्रा बंद करता येणार नाही. केंद्र सरकारकडून नैसर्गिक शेतीवर भर देण्याचे आव्हान केले जात आहे. पण प्रत्यक्षात हे शक्य नाही, त्यामुळे ही घोषणा केवळ हवेतच विरत आहे. पण जालना कृषी विभागाने केवळ घोषणाच नाही तर अंमलबजावणीला सुरवात केली आहे. एवढेच नाही तर रासायनिक खताला पर्याय म्हणून जैविक खत आणि सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीचा फायदाही लक्षात येणार असून उत्पादनात अचानक घटही होणार नाही..
रासायनिक खत बंद करणे हे लागलीच शक्य नाही. त्यामुळे जालना कृषी विभागाने एक वेगळे धोरण ठरवले आहे. जिल्ह्यात 6 लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. त्यानुसार दरवर्षी केवळ 10 टक्के क्षेत्रावर रासायनिक खत मुक्त शेतीला प्राधान्य दिले जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा मोठा बदल वाटत नाही शिवाय कृषी विभागाचा उद्देशही साध्य होत आहे. या दरम्यानच्या काळात सेंद्रीय शेतीचे महत्व शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर बदल घडून येईल असा विश्वास कृषी विभागाला आहे. या अनोख्या उपक्रमासाठी जिल्ह्यातील 8 तालुक्यातील क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. रासायनिक खताला पर्याय असणाऱ्या जैविक खतांच्या निर्मितीचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.
जिल्ह्यात 2 हजार 35 युनिट नाडेप तंत्रज्ञाद्वारे 8 हजार 140 मेट्रीक टन खत निर्माण केले जाणार आहे. 702 गांडूळ खत उत्पादन प्रकल्पातून 4 हजार 212 मेट्रीक टन गांडूळ खत तयार केले जाणार आहे. विद्राव्य खताचा वापर वाढवला जाणार आहे. बीजप्रक्रिया करण्याबरोबरच उसाचे पाचट कुजवून 41 हेक्टरवर हा अनोखा प्रयोग उभारला जाणार आहे.