गणेश सोळंकी, बुलढाणा : बुलढाणा (buldhana news) जिल्ह्यात यंदा तब्बल सात लाख 40 हजार हेक्टरवर शेतकरी खरीपाची लागवड (kharif cultivation) करणार आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये चार लाख हेक्टरवर सोयाबीन, एक लाख 98 हजार हेक्टरवर कापूस, 85 हजार हेक्टरवर तूर आणि इतर पिके घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षकांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मे महिना संपत आल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कामाला सुरुवात केली आहे. बुलढाणा (buldhana farmer news) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतीच्या मशागतीची कामे करताना दिसून येत आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुबार पेरणी तर कधी अवकाळी अशा अस्मानी त्याचबरोबर सुलतानी संकटांना आव्हान देत पुन्हा एकदा शेतकरी आपल्या शेतात मोठ्या उमेदीने मेहनत घेताना पाहायला मिळत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर गव्हाचं नुकसान झालं होतं. त्यामुळे आवक कमी झाली असल्याने गव्हाचे भाव वाढले आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, मात्र गव्हाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गव्हाला सध्या दोन हजार 140 ते दोन हजार 580 चा दर मिळत आहे. गव्हाच्या 963 या वाणाला पाच हजार 555 च्या चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाला आहे. तर गव्हाची आवक कमी आल्याने आणखीन भाव वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. गव्हाला चांगला दर मिळत असल्याने रब्बी हंगामात गव्हाची पेरणी वाढण्याची शक्यता आहे.
नंदुरबार जिल्ह्यात मागील खरीप हंगामात कापसाला विक्रमी 12 हजार प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला होता. त्यामुळे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड करण्यात आली होती. मात्र मागील हंगामाच्या तुलनेत या हंगामात तब्बल सात हजार रुपये कापसाच्या भावात घसरण झाली आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळाला नसल्याने मार्चपर्यंत चालणारा हंगाम मे महिना संपण्यात आला तरी देखील सुरू आहे. नंदूरबार जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन हे खरीपाचे मुख्य पिके आहेत. गेल्या खरीपात अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता, परंतु कापसाला चांगला भाव मिळेल आणि नुकसान भरपाई भरून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केली होती, मात्र शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्णतः भंग झाल्या आहेत.