जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : शेतकऱ्यांच्या (Nandurbar farmer ) कापसाला (kapus) मुहूर्ताच्या खरेदीच्या वेळेस चांगला दर मिळाला होता. मात्र त्यानंतर कापसाचे दर खाली आले, कापसाचे भाव वाढतील ही अपेक्षा ठेवून शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करून ठेवली होती. मात्र कापसाचे दर 8 हजार ते 8 हजार चारशे रुपयांच्या दरम्यान स्थिर आहे. मागील वर्षी मिळालेले कापसाचे दर (Krishi Utpanna Bazaar Samiti Nandurbar) यावर्षी मिळतील अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असली तरी अजूनही कापसाच्या दरात वाढ झालेली नाही.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाची आवक सुरू झाली असून कापसाला भाव नसला तरी किती दिवस भाव वाढीची वाट पाहावी असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनेही दरवाढीचे कोणताही सुतोवाच नसल्याचे स्पष्ट केले आहे. एकूणचं मागील वर्षी मिळालेल्या दरामुळे जिल्ह्यातील कापसाच्या क्षेत्रात प्रचंड वाढ झाली होती.
एकट्या नंदुरबार जिल्ह्याचा विचार केल्यास लाखो क्विंटल कापूस शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवला आहे. एकाच वेळी शेतकऱ्यांनी कापसाची विक्री सुरू केली, तर कापसाचे दर पडण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात घर करून आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घेऊन केंद्र सरकारकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मांडावा अशी मागणी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी केले आहे.