गोंदिया : हमीभाव खरेदी केंद्र ही शेतकऱ्यांच्या हितासाठी की सरकारच्या स्वार्थासाठी असाच सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. मध्यंतरी मुदतीपूर्वीच राज्यातील (Chickpea Crop) हरभरा खरेदी केंद्र बंद केल्याने अजूनही 1 लाख 10 हजार शेतकऱ्यांचा प्रश्न कायम आहे. पिकांची नोंदणी करुनही त्यांना हरभरा हा खरेदी केंद्रावर विकता आला नाही. हे ताजे असतानाच आता (Gondia) गोंदियात (Paddy Crop) धान खरेदी केंद्राबाबतही असाच निर्णय घेण्यात आला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील खरेदी केंद्र ही 15 जून रोजी बंद होणार असताना गोंदिया जिल्ह्यातील खेरदी केंद्र हे बंदही करण्यात आले आहे. त्यामुळे धान पिकाच्या विक्रीची नोंदणी करुनही आता शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. रब्बी हंगामातील धान खरेदी सुरु असतानाच अचानक घेण्यात आलेल्या निर्णयाने शेतकरी हवालदिल झाला आहे.
जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरु झाल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. ठरवून दिलेल्या दरात धानाची खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांनाही दोन पैसे मिळत होते. शिवाय 15 जूनपर्यंत खरेदी केंद्र सुरु राहिली असती तर सर्वच शेतकऱ्यांचा माल विक्री झाला असता पण धान खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आता गैरसोय होणार आहे. आता उर्वरीत मालाचे करायचे काय असा सवाल उपस्थित झाला आहे. जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी अचानक खरेदी केंद्र बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 9 लाख 12 हजार 468 क्विंटल धानाची खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ते पूर्ण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीचा आधार होता. पण आता जो बाजारपेठेत दर आहे त्याच दरात विक्री करावी लागणार आहे. शिवाय आता खरेदी केंद्र बंद झाल्याने साहजिकच खुल्या बाजारपेठेत आवक वाढणार. शिवाय केंद्र बंद झाल्याने व्यापारी मनमानी दर आकारुन शेतकऱ्यांची लूट करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांना मोठा आधार असलेली खरेदी केंद्र बंद झाली तरी केंद्रापुढे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आता शेतकऱ्यांच्या मागणीने पुन्हा वाढीव मुदत मिळणार का हे पहावे लागणार आहे.
राज्यात सुरु कऱण्यात आलेली हऱभरा खरेदी केंद्र ही 29 मे पर्यंत सुरु राहणार होती पण हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले की लागलीच केंद्र ही बंद करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे पुन्हा केंद्र ही सुरु झाली पण रात्रीतुन राज्यातील सर्वच केंद्र ही बंद झाली होती. त्यामुळे 1 लाख 10 हजार शेतकऱ्यांनी नोंदणी करुनही हरभरा विक्री करु शकले नाहीत आता ते धान पिकाबाबत झाले आहे. हजारो क्विंटल धान शिल्लक असतानाच हा निर्णय घेतल्याने शेतकरी त्रस्त आहेत.