महाराष्ट्र : महाराष्ट्रातील (maharashtra) काही जिल्ह्यात मागच्या कित्येक दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मागच्या तीन दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. त्याबरोबर तापमान सुद्धा वाढलं आहे, राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या रबी पीकाचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकरी सरकारकडून किती मदत मिळणार याच्या प्रतिक्षेत आहेत. उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव (Khed Ambegaon) तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वातावरणामध्ये होत असलेल्या बदलाने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. तर शेतात हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतात असलेल्या ज्वारी पिकाला मोठा फटाका बसला असून या वातावरात बदलाचा सामना शेतकऱ्याला करावा लागत आहे .
बुलढाणा जिल्ह्यात खामगाव, बुलढाणा ,चिखलीसह अनेक तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेला गहू, हरबरा, मका वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडू लागली आहे. तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरूच आहे. खामगाव शहर आणि परिसरात तर १.४ मि.मी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. गेल्या ३ दिवसांपासून हवामानात बदल झाला असून ढगाळ वातावरणाने क्वचित सूर्यदर्शन होत आहे. सतत तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची धांदल उडत आहे. सध्या गहू, हरभरा तयार झाला असून तो शेतकऱ्यांच्या घरात येणे बाकी आहे. या अवकाळी पावसाने या पिकांची हानी होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होवू लागली आहे. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी शेतकरी चिंतातूर झाले आहे.
यवतमाळ मध्ये सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. हवामान विभागाचे गारांसह पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर गहू, चना काढणी आणि तो सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली त्यात काही शेतकऱ्यांनी बियाण्यांच्या दृष्टीने घेतलेल्या उन्हाळी सोयाबीनला मात्र फटका बसला आहे. उशिरा लागवड केलेल्या गव्हाचे देखील नुकसान झाले आहे. पीक काढणीसाठी मजूर किंवा हार्व्हेस्टर शोधणे आणि काढलेला माल सुरक्षित कोठे ठेवायचा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. त्यात गारपिटीच्या भीतीने शेतकरी चिंतातुर झाला आहे.