धुळे : महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या सगळीकडं शेतकरी मान्सून (Mansoon Update) वाट पाहत आहे. कारण मान्सून पुढे सरकण्यास उशीर झाला आहे. पुढच्या तीन दिवसात मान्सून पुन्हा सक्रीय होईल असं हवामान खात्यानं सांगितलं आहे. काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहे. तर काही पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात कृषी केंद्र चालकांनी पेरणीची सीजन असल्यामुळे विविध प्रकारची बियाणं आणि खतं विक्रीसाठी ठेवली आहेत. धुळे (dhule agricultural news) जिल्ह्यात नगाव येथील कृषी सेवा केंद्रावर चोरट्यांनी एकाच महिन्यात दुसऱ्यांदा हातसफाई केली आहे. ही चोरी भल्या पहाटे झाली आहे. चोरट्यांनी हा सगळा प्रकार सीसीटिव्हीत कैद केला आहे.
नगाव येथील महेश राजेंद्र पाटील यांचे मुंबई आग्रा महामार्गालगत माऊली ऍग्रो सर्व्हिस कृषी सेवा केंद्र आहे. या ठिकाणी मागच्या महिन्यात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून तब्बल पाऊने दोन लाखाची चोरी केली होती. चोरट्यांनी 94 कापूस बियाण्याची पाकिटे, पंचवीस हजार रोख व डिव्हीआर असा ऐवज लंपास केला होता. आता या चोरीला एक महिना उलटत नाही. तोपर्यंत याच दुकानावर दोन दिवसापूर्वी मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे वरील पत्रे काढून दुकानात प्रवेश केला. पंचवीस बियाणांची तीस हजार रुपये किमतीची पाकिटे चोरून नेली. या घटनेत चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून तो दुकानातून आपल्याकडे असणाऱ्या पिशवीत बियाणे पाकिटे टाकताना स्पष्ट दिसत आहे. पोलिसांना ही सीसीटीव्ही फुटेज देण्यात आली असून चोरटा हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महेश पाटील यांचे दुकान मुंबई आग्रा महामार्गाला लागून आहे. मात्र हे दुकान नगाव गावाच्या समोरील बाजूस दोन्ही रस्त्यांच्या बाजूला असल्याने मध्यरात्रीची संधी साधून याठिकाणी चोरट्यांनी चोरी केली आहे. पाटील यांचे एक महिन्याच्या आत दोन लाखापेक्षा जास्त नुकसान झाले असून आता तरी पोलिसांनी लक्ष घालावे अशी, संतप्त प्रतिक्रिया नगाव ग्रामस्थांनी व्यक्त करीत आहेत.