बुलढाणा : शेतीची मशागत करून पेरणीसाठी पावसाची (Maharashtra Monsoon Update) वाट पाहणाऱ्या बळीराजाची अखेर प्रतीक्षा संपली आहे. चिखली तालुक्यात (Monsoon Update) कमी-अधिक प्रमाणात पावसाच्या सरी सुरु असल्याने वातावरणात गारवा पसरला आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी पहिल्याच पावसाने चिखली तालुक्यातील पांढरदेव, भोरसा-भोरसी, नायगाव, पाटोदा तसेच पेनसावंगी या अति मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत आला आहे. पेरणीसाठी तयार केलेली जमीन वाहून गेल्याने आता काय करावं असा प्रश्न सुध्दा त्यांना पडला आहे. तात्काळ पंचनामे करुन दुरुस्तीसाठी (rain update) अर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी दिली आहे.
नागपुरात रात्रीपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. सकाळी उठल्यानंतर नागपूरकरांना छत्री आणि रेनकोट घेत घराच्या बाहेर पडावं लागलं. सध्याच्या पावसाची शेतकऱ्यांना अधिक मदत होणार आहे. नागपूर विभागाने आज आणि उद्या विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
अमरावती जिल्ह्यात मागच्या चार दिवसांपासून मध्यम आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु झाला आहे. नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याचं सौंदर्य फुललं असून तिथं पाहायला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून पुढील तीन दिवस पाऊसाचा जोर वाढणार आहे. पाऊस सुरु झाल्यापासून अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. गतवर्षीच्या जूनची तुलना केली, तर यावर्षी सरासरी ५० टक्केच पाऊस पडला आहे. हवामान खात्याने कोकणसाठी पुढील तीन दिवसांसाठी आँरेज अलर्ट जारी केला आहे. पुढील 48 तासात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे.
परभणी जिल्ह्यात रिमझिम पाऊस पडत आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परभणीकर अजूनही मोठ्या पावसाची प्रतिक्षा करीत आहेत.
पुढच्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रायगड पालघर ठाण्यात ही दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड रत्नागिरी येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
रात्रीच्या सुमारास भंडारा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सकाळ सगळीकडं ढगाळ वातावरण असून हवेत गारवा पसरला आहे. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असून या पावसानंतर शेतीच्या कामांना वेग येणार आहे. जमीन साफ करणे , कचरा जाळणे, मशागत करणे, नांगरणी करणे अशी अनेक महत्त्वाची कामे सुरू होणार आहेत.