Banana Crop : पीक पध्दतीमध्ये बदलापेक्षा उपाययोजना गरजेच्या, जळगावात केळी नुकसानीवरुनही ‘राजकारण’

| Updated on: Jun 15, 2022 | 9:22 AM

जळगाव जिल्ह्यात केळीचे क्षेत्र अधिक आहे. शिवाय केळीला आता फळाचा दर्जा मिळाल्यानंतर क्षेत्र वाढतच आहे. केळीची वाढ होत असताना अवकाळी पाऊस आणि आता तोडणीच्या दरम्यान मान्सूनचा झटका यामुळे दरवर्षी नुकसान हे ठरलेलेच आहे. जिल्ह्यात सर्वत्र केळीची तोडणी आणि व्यापाऱ्यांकडून सौदे होत असतानाच गेल्या 5 दिवसांपासून पावसामध्ये सातत्य आहे.

Banana Crop : पीक पध्दतीमध्ये बदलापेक्षा उपाययोजना गरजेच्या, जळगावात केळी नुकसानीवरुनही राजकारण
पावसामुळे जळगाव जिल्ह्यात केळी बागांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे.
Follow us on

जळगाव : राज्यात अजूनही मान्सून पूर्ण क्षमतेने सक्रिय झालेला नाही. मात्र, केळी पिकाचे मुख्य आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसलेला आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या (Banana Garden) केळी बागा आडव्या झाल्या आहेत. केळी नुकसानीची पाहणी करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकसान टाळायचे असेल तर शेतकऱ्यांनी (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल करणे गरजेचे असल्याचा सल्ला दिला होता. आता यावरुनच राजकारण सुरु झाले आहे. केळीमुळे जळगावची वेगळी ओळख आहे. त्यामुळे पीक बदलण्यापेक्षा शेतकऱ्यांना (Measures) उपाययोजना राबवल्या तर नुकसानही टळणार आहे आणि जिल्ह्याची ओळखही पुसणार नसल्याचा टोला खा. उन्मेश पाटील यांनी दिला आहे. केळी नुकसानीनंतर आता पीक पाहणी आणि आश्वासनांचा पाऊस पडत आहे. पण ज्या शेतकऱ्यांची उभे पीक आडवे झाले त्यांना गरज आहे ती मदतीची. त्यामुळे पाहणी, पंचनाम्यांचेही आदेश आले आता मदत मिळणार का हेच पहावे लागणार आहे.

पावसासह वादळी वाऱ्याने नुकसान

जळगाव जिल्ह्यात केळीचे क्षेत्र अधिक आहे. शिवाय केळीला आता फळाचा दर्जा मिळाल्यानंतर क्षेत्र वाढतच आहे. केळीची वाढ होत असताना अवकाळी पाऊस आणि आता तोडणीच्या दरम्यान मान्सूनचा झटका यामुळे दरवर्षी नुकसान हे ठरलेलेच आहे. जिल्ह्यात सर्वत्र केळीची तोडणी आणि व्यापाऱ्यांकडून सौदे होत असतानाच गेल्या 5 दिवसांपासून पावसामध्ये सातत्य आहे. एवढेच नाही तर वादळी-वाऱ्यामुळे केळी बागा ह्या आडव्या होत आहेत. त्यामुळे एकरी लाखोंचा खर्च करुनही पदरी काय पडणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे.

केळी पिकावरुन राजकीय मतभेद

पावसामुळे केळी बागांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी लोकप्रतिनिधी आता बांधावर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केळीची पाहणी करुन शेतकऱ्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता केळीला पर्याय शोधणे गरजेचे आहे. शिवाय हे नुकसान काही यंदाचेच नाही गेल्या 4 वर्षापासून होत असल्याने त्यांनी हा सल्ला दिला होता. आता त्यावर खा. उन्मेश पाटील यांनी सवाल उपस्थित केला आहे. पीकच बदलण्यापेक्षा योग्य त्या उपाययोजना राबवून उत्पादनवाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय आठ दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण करणेही गरजेचे असल्याचे सांगितले.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांना अपेक्षा मदतीची

केळी जोपासताना सततच्या अवकाळी पावसामुळे उत्पादनावरील खर्च तर वाढला आहेच पण काढणीच्या दरम्यान चिंता होती ती दराची. कारण केळीला 300 ते 400 रुपये क्विंटल असा दर होता. आता कुठे दर वाढत असताना वादळी वाऱ्यांने बागांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे यामध्ये कोणतेही राजकारण न होता पंचनामे करुन प्रत्यक्ष मदत करावी अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांची आहे.