अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावतंय. जिल्ह्यात जवळपास 60% खरीपाची पेरणी झाली असून येत्या काही दिवसात जर पाऊस पडला नाही तर शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहेत. (Nagar District Farmer facing problem of drought due to lack of Monsoon Rain)
अहमदनगर जिल्ह्यात साधारण 2 लाख 61 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झालीय. सुरूवातीला अनेक तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात खरीप पिकांची पेरणी केली आहे. मात्र गेल्या आठ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने ही पिकं आता संकटात सापडली आहेत.
नगर जिल्ह्यात सर्वात जास्त बाजरी आणि उडीद यांचा पेरा झालाय. त्याखालोखाल तुर, मुग, मका, वाटाणा आणि भाताची पेरणी झालीय. अजूनही अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली नाहीय. तर ज्यांनी पेरणी केली आहे त्यांची पिके वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे.
अनेक शेतकरी तर लाखो रूपये खर्च करून पिकाला स्प्रिंकलरने पाणी देताना दिसत आहेत. राहाता तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. शेतकरी वरुणराजाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलाय पण वरुणराजा काही दर्शन देईना.. जर येत्या काही दिवसांत वरुणराजाने दर्शन दिलं नाही तर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहे.
अकोला जिल्हासह वाडेगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक जण ‘मुसळधार पाऊस बरसू दे आणि शेतकऱ्याचं रान हिरवंगार होऊ दे’, अशी प्रार्थना परमेश्वराकडे करत आहेत. तर काहींनी धोंडी धोंडी पाणी दे म्हणत वरुणराजाला साकडं घालत आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून अवेळी आणि अपुऱ्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांला नापिकीला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी कमालीचा धास्तावला आहे. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी तरी बऱ्यापैकी पाऊस होईल या आशेने बी-बियायाणे व खताची जुळवाजुळव केली. पावसानेही थोड्या प्रमाणात हजेरी लावल्याने शेतकरी पेरते झाले होते. मात्र पेरणी केलेली पिके बऱ्यापैकी अंकुरले असतानाच गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने पिके शेवटची घटका मोजतांना दिसत आहेत.
(Nagar District Farmer facing problem of drought due to lack of Monsoon Rain)
हे ही वाचा :
मराठवाडा दुष्काळाच्या छायेत, लाखो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी ‘धोंडी धोंडी पाणी दे…’ म्हणत शेतकऱ्यांचं साकडं….!