मालेगाव – निसर्गाच्या लहरीपणाला आणि अनियमित वीज पुरवठा (Power supply) असताना देखील मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने (Farmer) कांदा पिकविला. पण बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांना कांदा (Onion) विक्री न करता चांगला बाजारभाव मिळण्याच्या प्रतिक्षेत कांदा चाळीत साठवण करुन ठेवला. मात्र कष्टाने पिकविलेल्या कांद्यावर वैऱ्याची नजर पडली अन् त्याने थेट कांदा चाळीतच युरिया मिश्रीत पाणी टाकले. त्यामुळे संपूर्ण कांदा नासला आहे. झालेल्या प्रकारामुळे शेतकऱ्याचे 70 ते 80 हजारांचे नुकसान झाल्याची घटना लोणवाडे शिवारात घडली आहे. या प्रकरणी शेतकऱ्याने पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात इसमाचा पोलिस शोध घेत आहेत.
पोलिसांकडे दाखल झालेली माहिती अशी आहे की, कांदा उत्पादक शेतकरी तुषार भुसे (रा. सोयगाव, मालेगाव) यांची लोणवाडे शिवारात शेती आहे. त्यांनी यंदा मोठ्या कष्टाने कांदा पिक घेतले आहे. मात्र सध्या कांद्याला चांगला बाजारभाव नसल्यामुळे त्यांनी कांदा विक्री न करता चाळीत साठवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कांदा चाळीत युरिया हे रासायनिक खत टाकल्याने संपूर्ण कांदा खराब होण्याला सुरुवात झाली आहे. यामुळे भुसे यांचे तब्बल 70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी भुसे यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलील हवालदार खांडेकर तपास करीत आहेत.
महाराष्ट्रात आत्तापर्यंत अशा अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. अनेकदा चांगल्या आलेल्या पीकाचे नुकसान केले जाते. केळीच्या पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित इसमांवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांची असते. कारण शेती करताना अधिक काबाडकष्ठ घ्यावे लागतात.
हाता तोंडाला आलेलं पीक खराब झाल्याने शेतकऱ्यांचं वार्षिक आर्थिक बजेट कोलमडतं असतं. मालेगाव झालेल्या पीकाच्या नुकसानीनंतर अनेक शेतकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.