नाशिक : मृद आणि जलसंधारण विभागाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जलयुक्त शिवार ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा संपूर्ण राज्यामध्ये गावं पाणीदार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातही 213 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये चांदवड तालुक्यात सर्वाधिक गावांची निवड करण्यात आलेली आहे. चांदवड तालुक्यातील 21 गावांची निवड करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये राज्यातील निवड झालेल्या गावांची नुकतीच यादी प्रसुद्ध झाली आहे. जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी अडवून वर्षभर साठवून ठेवण्याचे काम या अभियानातून केले जाणार आहे.
सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2014 मध्ये मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळत असताना शेतकऱ्यांसाठी पाण्याचा विषय मार्गी लावण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान ही योजना सुरू करण्यात आली होती.
या योजनेच्या माध्यमातून विविध गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आल्यानं शेतकऱ्यांची पाण्याची समस्या दूर झाली होती. जलयुक्त शिवारमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता.
याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यांमध्ये ही योजना राबवावी अशी मागणी होत असतानाच सरकार बदलले आणि त्यानंतर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर जलयुक्त शिवार ही योजना बंद करण्यात आली होती.
जलयुक्त शिवार योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं सांगत अनेकांनी आरोप केल्यानंतर एसआयटीच्या माध्यमातून चौकशी देखील सुरू झाली होती. यामध्ये तत्कालीन मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्यासह काही मंत्र्यांच्या चौकशी देखील सुरू झाल्या होत्या.
मात्र त्यानंतर पुन्हा एकदा काही महिन्यांपूर्वी सरकार बदलल्यानंतर जलयुक्त शिवार ही योजना पुन्हा एकदा सुरू केली जाणार अशा स्वरूपाची घोषणा विद्यमान सरकारच्या वतीने करण्यात आली होती. त्यात पार्श्वभूमीवर आता राज्यात जलयुक्त शिवार अभियान ही योजना नव्याने सुरू करण्यात आली आहे.
राज्यातील ज्या गावांची निवड झालेली आहे त्याची यादी प्रसारित झाली असून त्यामध्ये नाशिक जिल्ह्यात 231 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सुरुवातीला 337 गावांची निवड करण्यात आली होती त्यानंतर विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यासाठी 210 गावांचा उद्दिष्ट ठरवून दिलं होतं.
मात्र त्यानंतर शासनाकडील उपलब्ध निधीचा विचार करून त्यापैकी 231 गावे चालू वर्षासाठी निश्चित करण्यात आली असून निवड समितीच्या माध्यमातून 231 गावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे.खरंतर या योजनेसाठी लागणारा निधी हा केंद्र आणि राज्य पुरस्कृत मृदू आणि जलसंधारण विभागाच्या माध्यमातून उभा केला जाणार आहे.
यामध्ये कृषी विभागासह, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, जिल्हा नियोजन आणि विकास निधी, जिल्हा परिषद, सीएसआर निधी आणि सार्वजनिक भागीदार असलेल्या काही संस्थांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध केला जाणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव 20, नांदगाव 12, चांदवड 21, येवला 16, देवळा 14, निफाड 16 , सिन्नर 15, दिंडोरी 14, नाशिक 11, पेठ 15, सटाणा 17, कळवण 15, सुरगाणा 15, इगतपुरी 15, त्रंबकेश्वर 15 अशी तालुकानिहाय निवड करण्यात आली होती.