नाशिक : शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका सुरूच आहे. कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट या दुहेरी संकटामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. नाशिक जिल्ह्यात तर अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामध्ये शेतीमालाचे नुकसान होत असतांना आर्थिक संकट उभे राहत आहे. अशातच हवामान ( IMD ) खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सोमवारी मध्यरात्री विजेच्या कडकाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील तांदूळवाडी येथील एका 60 वर्षीय शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू ( Farmer Death News ) झाला आहे. शेतात काढून ठेवलेले कांदे झाकण्यासाठी शेतकरी शेतात गेला असता अंगावर वीज पडून जागीच ठार झाला आहे. नाना गमन चव्हाण असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या आठवड्यात राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा शेतीमाल अक्षरशः भुईसपाट झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
खरं तर पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातून पीक गेले होते, त्यामुळे रब्बीचे पीक शेतकऱ्यांना तारणार अशी स्थिती होती. त्यातच आता अवकाळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून मदत लवकरात लवकर केली जाईल असं आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आलं होतं. मात्र मदत सोडाच अद्याप पंचनामाही झालेला नसून पुन्हा एकदा पाच दिवस वातावरणात मोठा बदल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पाच दिवस पुन्हा राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे आणि त्याची सुरुवात सोमवार पासून सुरू झाली आहे. अशातच नांदगाव येथील काही भागात रात्रीच्या वेळेला विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस येत होता.
अचानक येऊ पाऊस येऊ लागल्याने शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेले कांदे झाकण्यासाठी गेलेल्या असताना त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून संतापाची भावना निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांना अद्यापही कुठला दिलासा मिळाला नसताना अशी संकटाची मालिका सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण होऊ लागला आहे. सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.