नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बळीराजा ( Farmer Loss ) हतबल झाला आहे. अवकाळी पावसाने मोठं नुकसान केलेले असतांना शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. काही दिवसांपूर्वी कोथिंबीरीला भाव मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओरडून ओरडून नागरिकांना फुकट कोथिंबीर वाटली होती. त्याचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल ( Viral Video ) झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच अवकाळी पाऊस आणि वादळी वारा आल्याने ते देखील एक संकट शेतकऱ्यांवर आहे. त्यामुळे कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट आशा दुहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
नुकताच एक नाशिकची चांदवड बाजार समितीतील व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मिडियावर हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दुष्काळात तेरावा महिना अशीच काहीशी गत नाशिकमधील शेतकऱ्यांची झाली आहे. एकूणच शेतकऱ्यांच्या मागे लागलेली साडेसाती कधी संपणार असेही बोलले जात आहे.
अवघा एक रुपये जुडीला भाव मिळाल्याने संतप्त झालेल्या युवा शेतकाऱ्याने नाशिकच्या चांदवड बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच कोथिंबीर फेकून दिली आहे. संतप्त झालेल्या शेतकाऱ्याने आपल्या शेतमालावरच संताप व्यक्त केला आहे.
अमर गांगुर्डे या तरुण शेतकऱ्याने कोथिंबीर विक्रीस आणली होती. तिला शेकडा शंभर रुपये भाव मिळाला. म्हणजेच जुडीला एक रुपया भाव मिळाला. त्यामुळे शेतकाऱ्याने संताप व्यक्त करत गेटवर कोथिंबीर फेकून देत सरकारच्या विरोधात उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.
चांदवड बाजार समितीत बळीराजाचा पाहा कसा संताप झालाय. जनावरांचं पोट भरलं, पण सरकारचं भरलं नाही म्हणत तरुण शेतकऱ्याची उद्विग्न… #farmer #nashik #apmc #viralvideo pic.twitter.com/ozWHwqKrQr
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) March 11, 2023
जनावरांचे सुद्धा पोट भरले आहे. पण अजून सरकारचं पोट भरलं नाही. कोविड काळात याच शेतकऱ्यांने तुमचं पोट भरवलं आहे हे विसरले का ? म्हणत तरुण शेतकऱ्याने सवाल उपस्थित केला आहे. शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी उद्विग्न होऊन प्रतिक्रिया देत आहे.
पंधरा हजार रुपये खर्च आलेल्या कोशिंबीरतून अवघे 100 रुपये मिळणार असल्याने ह्या शेतकऱ्याने बाजार समितीतच संताप व्यक्त केला आहे. आगामी काळात अशीच परिस्थिती राहिली तर शेतकरी अक्षरशः टोकाचे पाऊल सुद्धा उचलू शकतो अशी स्थिती सध्या शेतकऱ्यांची झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन होत असते. त्यामुळे बाजारसमितीत मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी येत असतो. मात्र सध्या भाव मिळत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांची निराशा होत असून शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे.