नाशिक : कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट अशा दुहेरी संकटामुळे बळीराजा पुरता मेटकुटीला आला आहे. मागील महिण्यात अवकळी पाऊसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत अद्याप खात्यावर आलेली नसतांना पुन्हा एकदा अवकाळी पासून आणि गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळ कांदा, डोंगळे(कांद्याचे बियाणे निर्माण करणारे पीक), गहू आणि द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये नाशिकच्या निफाड परिसरात असलेल्या द्राक्षबागा अक्षरशः भुईसपाट झाल्या आहेत. खरंतर उत्तम दर्जाचा द्राक्ष बाग मागील पावसात कसाबसा वाचवलेला असतांना नुकत्याच पावसात भुईसपाट झाला आहे. त्यामध्ये बळीराजाच्या स्वप्नांचा अक्षरशः चिखल झाला आहे. त्यामुळे सततच्या संकटामुळे शेतकरी मेटकुटीला आला आहे.
नाशिकच्या ग्रामीण भागात शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी सायंकाळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला शेतमाल अक्षरक्षा मातीमोल झाला आहे. अनेक ठिकाणी द्राक्ष बाग उन्मळून पडले आहे. यामध्ये द्राक्षबाग विशेष म्हणजे काढणीला आलेला असतानाच हे नुकसान झाले आहे.
बहुतांशी ठिकाणी कांदे काढणीला आले होते. त्यात कांद्याचा अक्षरशः चिखल झाला आहे. तर काही ठिकाणी कांदे काढून त्याची साठवण शेतात केलेली असतांना संपूर्ण कांदा भिजून गेला आहे. त्यामुळे कांद्याची परिस्थिती आणखीच गंभीर होणार असून कांदा साठवण केल्यास खराब होण्याचे प्रमाण जास्त असणार आहे.
तर दुसरीकडे लाखो रुपये खर्च करून उभ्या केलेल्या द्राक्ष बागा भुईसपाट झाल्या आहेत. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे बाळासाहेब दगु आहेर, संजय कोरडे, भाऊसाहेब खर्डे, प्रवीण कोरडे, विष्णू गायखे, सोमनाथ लोंढे, सुरेश गडाख यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागेचे नुकसान झाले आहे.
भुईसपाट झालेली द्राक्षबाग पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रुंच्या धारा सुरू झाल्या आहेत. जगाचा पोशिंदा हतबल झाल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे. या संकटात तरी आश्वासनांची खैरात न वाटता प्रत्यक्षात मदत करावी अशी मागणी केली जात आहे. एका रात्रीत शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झाल्याने माय बाप सरकारच्या मदतीकडे शेतकरी आस लावून बसला आहे.
द्राक्षबागेला खरंतर लाखो रुपयांचा खर्च केलेला असतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेकदा शेतकऱ्याला तोटा सहन करावा लागतो. सौदा झालेला असतांना व्यापारी संपर्क करणं सोडून देतो. पाऊस पडला तर कमी भावाने द्राक्ष खरेदी करतो. त्यामुळे द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांना मदतीची गरज निर्माण झाली आहे.