नाशिक : एकीकडे अवकाळी चा फटका बसल्याने मोठ्या संख्येने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. असे असताना दुसरीकडे मात्र कांदा बाजार भावातील मंदी लक्षात घेऊन येवला तालुक्यातील एका शेतकाऱ्याने किमया साधली आहे. येवला तालुक्यातील ममदापूर येथील शेतकऱ्याने मिरची आणि कलिंगडाची आंतरपीक शेती करून शेतकऱ्याने आर्थिक प्रगतीचा मार्ग शोधला आहे. दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यातील ममदापूर येथील शेतकरी जनार्दन उगले यांनी मिरची पिकाचे महत्व आणि मागणी लक्षात घेऊन शेततळ्याच्या पाण्यावर शेतमाल पिकवत लाखो रुपये कामविले आहे.
जनार्दन उगले यांनी एक एकर शेतीत मल्चिंग पद्धतीने कलिंगड पिकात तिखट अन् फिकी या दोन प्रकारच्या मिरचीची लागवड केली आहे. पिकाची योग्य निगा त्यांनी राखली आहे. मिरचीला फुल, कळी चांगल्या प्रमाणत असून तोडणीला देखील आली आहे.
बाजारात मिरचीला चांगली मागणी असून फिकी मिरचीला 30 रुपये किलो तर तिखट मिरचीला 50-55 किलो इतका भाव मिळत आहे. अंतर पीक म्हणून घेतलेलं कलिंगड देखील तयार झालं आहे. त्याला देखील बाजारात चांगली मागणी आहे.
एकीकडे पारंपरिक पिकांची लागवड करण्याची धूमधाम चालू असतांना अभ्यासू शेतकरी जनार्दन साहेबराव उगले यांनी मिरची आणि कलिंगड पिकाची लागवड केली आहे. या शेतकऱ्याला दोन ते अडीच लाख रुपये खर्च आतापर्यंत आला आहे.
तर कलिंगड दहा रुपये किलो प्रमाणे व्यवहार झाला असून अंदाजे 30 टन कलिंगडाचे पीक येणार असून यात 3 लाख रुपये झाल्यास झालेला खर्च कलिंगडातून निघेल आणि चार ते साडेचार लाख रुपये मिरचीतून उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग केल्यास इतर पिकांच्या तुलनेत चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते असे त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील या अभ्यासू शेतकऱ्याने शेतीतून समृद्ध होण्याची किमया साधल्याचे दिसून येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील शेतकरी खरंतर मोठ्या प्रमाणात कांदा, द्राक्ष आणि डाळिंब यांसह गहू आणि सोयाबीन ही पिके घेतो. मात्र, काही ठिकाणी पाण्याची स्थिती चांगली नसल्याने अनेक शेतकरी खरीप आणि रब्बीची सुरुवातीची पिके घेतात. त्यामुळे अवकाळी किंवा गारपीट आल्यास मोठे नुकसान होत असते.
तर नुकताच आलेला अवकाळी पाऊस आणि गारपीट मधून पीक वाचवून शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न घेण्याचे कसब उगले यांना आल्याने इतर शेतकऱ्यांमध्ये जनार्दन उगले हे उठून दिसत आहे.