लासलगाव, नाशिक : कांद्याची पंढरी म्हणून नाशिकची ओळख आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील लासगाव बाजार समितीची ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचं सर्वश्रुत आहे. याच बाजार समितीत हजारो शेतकरी कांदा विक्रीसाठी येत असतात. नेहमीप्रमाणे कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याच्या कांद्याचा लिलावच झाला नाही. त्यामुळे संतापलेलेल्या शेतकाऱ्याने बाजार समितीतून बाहेर पडत संताप व्यक्त केला आहे. लाल कांद्याला ग्राहक नसल्याने व्यापारीही लिलावच पुकारत नसल्याने शेतकरी नाराज आहे. त्यामुळे बाजार समितीतून बाहेर पडलेल्या शेतकऱ्याने बाजार समितीच्या बाहेर कांदा ओतून देत संताप व्यक्त केला आहे. या घटनेने सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
काही महिन्यांपासून लाल कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहे. उन्हाळ कांदा बाजारात येऊ लागल्याने कांद्याची खरेदी जवळपास थांबली गेली आहे. मात्र, उशिरा लागवड केलेले लाल कांदे अद्यापही बाजारसमितीत येत आहे. त्यात लाल कांद्याची मागणी घटली गेली आहे.
लाल कांद्याचे ग्राहक नसल्याने व्यापारी ते खरेदी करत नाही. नाफेडकडूनही बरेच दिवस उलटून गेले खरेदी बंद आहे. त्यामुळे लाल कांद्याची मागणी नसल्याने ज्या शेतकऱ्यांनी लाल कांदा आणला आहे त्याचा लिलावच पुकारला जात नसल्याचे समोर आले आहे.
चांदवड तालुक्यातील कोलटेक पाटे येथील सचिन विठ्ठलराव गांगुर्डे आणि रवी किसन तळेकर यांनी लाल कांद्याचे पिक घेतले होते. त्यातील शेवटच्या टप्प्यात असलेले दोन नंबर प्रतवारी असलेला लाल कांदा विक्रीस आणला होता.
जवळपास तीस क्विंटल लाल कांदा ट्रॅक्टर मध्ये भरून 18 ते 20 किलोमीटर आंतर असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये दुपारच्या सत्रात विक्रीसाठी आणला होता. लिलावाला सुरुवात झाली मात्र ट्रॅक्टर जवळ येताच व्यापारी पुढे निघून गेल्याने शेतकरी चांगलाच भडकले होते.
कांदा उत्पादक शेतकरी यांनी रवी तळेकर यांनी आपण माझ्या लाल कांद्याचा लिलाव का केला नाही ? अशी विचारणा व्यापाऱ्यांना केली असता या कांद्याला ग्राहक नसल्याचे कारण देत व्यापारी लिलावासाठी पुढे निघून गेले.
दरम्यान तीन हजार रुपये खर्च करून हे कांदे विक्रीसाठी आणला होता. काहीतरी बाजारभावाने लिलाव करणे अपेक्षित होते. मात्र लीलाव न झाल्याने घरी नेऊन घरच्यांचा संताप करण्यापेक्षा बाजार समितीच्या आवाराबाहेर काही अंतरावर शेतकऱ्यांनी कांदे ओतून दिले.
बायपासच्या रस्त्याच्या कडेला संध्याकाळच्या वेळी घराकडे जाताना ओतून देत आपला संताप व्यक्त केल्याचे शेतकरी रवी तळेकर यांनी म्हंटलं आहे. याबाबत आम्हाला काहीच माहिती नसल्याने यावर आम्ही काही बोलू शकत नसल्याची भूमिका लासलगाव बाजार समितीकडून देण्यात आली आहे.