नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेतकरी तसा प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र, अनेक शेतकरी या पारंपरिक पिकापासून वेगळा पर्याय शोधत लाखो रुपये कमवत असल्याचे दिसून येत आहे. त्यात गेल्या काही वर्षांपासून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले असून कांद्यातून तोटाच सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा पीक सोडून टरबूज शेतीची लागवत करून लाखो रुपये कमविले आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शंकर कोल्हे यांनी केलेल्या शेतीची जोरदार चर्चा होत आहे.
कांद्याच्या शेतीतून फायदा होण्यापेक्षा त्यातून उत्पादन खर्च सुध्दा वसूल होत नसल्याने नाशिकच्या चांदवड तालूक्यातील रायपूर येथील शेतकरी शंकर कोल्हे यांनी चार एकर शेतीत टरबूज शेती केली होती. त्यातून त्यांना भरघोस उत्पन्न हाती लागले आहे.
दिड महिन्यापुर्वी कांद्याची स्थिती पाहून त्यांनी टरबूज शेती करण्याचा निर्णय घेतला होता. अडिच लाख रुपये खर्च करत शंकर कोल्हे यांनी चार एकर शेतीत टरबूजाची लागवड केली होती. अडीच महिण्यात म्हणजेच 75 दिवसांत त्यांचे फळ विक्रीला आले आहे.
शंकर कोल्हे यांच्या शेतीतील टरबूज हा रमजान महिन्यातच विक्रीला आल्याने भाव देखील चांगला मिळत आहे. आठ ते सव्वा आठ रुपये किलोचा भाव मिळत असून आत्तापर्यन्त 32 हून अधिक टन टरबूज व्यापाऱ्यांनी खरेदी केला आहे. अद्यापही विक्री सुरूच आहे.
महाराष्ट्रासह जम्मू, गुजरात या बाजार समितीत टरबूज विक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामध्ये भांडवल आणि मेहनतीचा खर्च वजा करून साधारणपणे सहा ते सात लाख रुपये निव्वळ नफा मिळणार आहे. कांद्यात खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्याला टरबूजाने तारल्याची स्थिती आहे.
कांदा लागवडी नंतर काढणीपर्यंत अडिच महिन्याचा कालावधी लागतो. त्यातच कांद्याला सध्या भाव नाही, मात्र टरबूजाच्या शेतीतून अवघ्या काही दिवसातच फायदा झाला आहे. त्यामुळे रायपूर येथील शेतकरी शंकर कोल्हे यांनी यशस्वी शेतीची किमया साधली असून त्यांना त्याचे समाधान आहे.
कांद्याची परिस्थिती पहिली तर चार महीने अवधी जातो, त्यात बाजारभाव मोठ्या प्रमाणात कोसळले आहे. झालेला उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त शेतमालातून कसर भरून काढावी लागते अन्यथा मेटकुटीला येण्याची वेळ येते.