नाशिक : हवामान विभागाच्या अंदाजानुसार ( IMD ) वातावरणात पुन्हा बदल झाल्याने द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पावसाचे तुरळक थेंब पडू लागल्याने हातातोंडाशी आलेला घास वाया जातोय का अशी भीती द्राक्ष उत्पादक शेतकरी ( Grapes Farmer ) व्यक्त करत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे निफाड तालुक्यातील पश्चिम भागातील सायखेडा चांदोरी सह परिसरातील गावांना फटका बसला होता, आता पुन्हा अवकाळी पावसामुळे चाळीस ते पन्नास रुपये किलो मिळणारे बाजार भाव अक्षरशः उत्पादन खर्च निघणार नाही असा पंधरा ते वीस रुपये पर्यंत कोसळल्याने कुटुंबाचे उदरनिर्वाह करावे कसे ? घेतलेले कर्ज फेडावे कसे ? असा यक्ष प्रश्न द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पडू लागला आहे.
गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये कोसळला होता याच वेळेला वादळी वारा देखील मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे शेतीमालाचे मोठे नुकसान झाले होते.
नाशिक जिल्हा हा कांदा द्राक्ष भाजीपाला डाळिंब गहू अशा पिकांसाठी प्रसिद्ध आहे. आणि हीच पिकं अवकाळी पावसामुळे धोक्यात आली होती. त्यातून काही अंशी शेतमाल शेतकऱ्यांच्या हाती लागला होता. त्यामुळे जिथे दोन पैशांचा फायदा होईल अशी स्थिती असताना तिथे मात्र झालेला उत्पादन खर्चही निघणार नाही अशी स्थिती आहे.
अशातच पुन्हा एकदा हवामान विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना धक्का देणारी बातमी समोर आली. त्यामध्ये 13 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत अवकाळी पाऊस हा वादळी वाऱ्यासह येण्याची शक्यता वर्तवली आहे. आणि त्याच नुसार राज्यातील हवामान बदल झाला आहे.
त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड मध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू लागलेला आहे. त्यामुळे द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाडमध्ये द्राक्ष उत्पादकांची चिंता अधिकच वाढली असून द्राक्षाचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहे.
मागील आठवड्यामध्ये अवकाळी पावसाच्या झालेल्या नुकसानीचे अद्यापही पंचनामे झालेले नाहीम, त्याच वेळेला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणच्या शेतात जाऊन पाहणी केली होती.
लवकरात लवकर पंचनामे करून मदत जाहीर केली जाईल अशा स्वरूपाचे आश्वासन देखील दिले होते मात्र आता पुन्हा एकदा अवकाळी पाऊस येऊ लागला आहे तरी देखील पंचनामे पूर्ण झालेले नाही ना कुठली मदत मिळाली.
त्यामुळेच शेतकऱ्याच्या अडचणीत वाढ होत असताना लोकप्रतिनिधींकडून आणि सरकारकडून निव्वळ आश्वासनांची खैरात वाटली जाते अशी परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे त्यामुळे आता तुम्हीच सांगा जगायचं कसं असा उद्विग्न सवाल शेतकरी उपस्थित करू लागलाय