नाशिक : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून शेतमालाचे भाव पडल्याचं समोर आलं आहे. टोमॅटो, ढोबळी मिरची उत्पादक शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाल्याच समोरं आलं होतं. आता येवल्यात टोमॅटोच्या लाल चिखल नंतर मिरचीचा ठसका शेतकऱ्यांना बसल्याचं पाहायला मिळत आहे. येवला तालुक्यातील अंदरसूल येथील शेतकऱ्याने कवडीमोल बाजार भाव मिळत असल्याने उभे मिरचीचे पीक कापून टाकलं आहे. शेतकऱ्यानं मिरचीची लागवड करताना लाखो रुपये खर्च केले होते. मात्र, आता भाव पडल्यानं मिरची काढून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांसमोर राहिला नाही.
येवला तालुक्यातील अंदरसूल येथील शेतकरी रघुनाथ जगताप यांनी कांद्याच्या पिकात फायदा होत नसल्याने वेगळे प्रयोग करावे म्हणून मिरचीचे पीक घेतले. या शेतकऱ्याने दीड एकर मध्ये मिरचीचे पीक घेतले होते. यासाठी 1 लाख 80 हजार रुपये खर्च केला होता. मात्र दिवसेंदिवस मिरचीला कवडीमोल भाव मिळत गेल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आपले उभे मिरचीचे पीक उपटून बांधावर फेकून दिले. शेतकऱ्यानं आपले दीड एकर मिरचीचे उभे पीक उपटून टाकले आहे. काही मिरचीची झाडं ही फेकून देत आपला संताप व्यक्त केला आहे.
स्थानिक बाजार पेठे तीन रुपये किलोला बाजार भाव मिळत असल्याने मुंबई येथे नेले असता नऊ रुपये इतका कवडीमोल बाजार भाव मिळाला. यात उत्पादन खर्च तर दूरच काढणी आणि वाहतूक खर्चही निघाला नाही. निराश झालेल्या शेतकऱ्यानं मिरचीचे उभे पिक उपटून फेकून दिल्याचे मिरची उत्पादक शेतकरी सांगतात आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. आतातरी सरकारने या बळीराजाकडे लक्ष द्यावे अशी मागणी या मिरची उत्पादक शेतकरी रघुनाथ जगताप आणि नवनाथ जगताप यांनी केली आहे
प्रधानमंत्री पीक विम्यातून मिरची पिकाला वगळण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीने मिरची पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना कुठली नुकसान भरपाई मिळणार नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. राज्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर मिरचीची लागवड केली जात असते. राज्यात सर्वाधिक मिरची नंदुरबार जिल्ह्यात उत्पादित होते. यावर्षीही पाऊस कमी असतानाही मिरचीच्या क्षेत्रात थोडीफार घट आली आहे. यावर्षी सात ते आठ हजार एकर क्षेत्रावर आतापर्यंत मिरचीची लागवड झाली असून, सरकारने पीक विम्यातून मिरची पिकाला वगळले असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
मिरची पिकावर येणाऱ्या विविध रोगांनी मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत असतात. त्यात दरवर्षी येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत असतो. मात्र मिरचीचा पीक विमा योजनेतून वगळल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांची गत दुष्काळात तेरावा महिना अशी झाली आहे.
इतर बातम्या
ओबीसींना आरक्षण न मिळण्यास भाजपच जबाबदार, केंद्राने इम्पिरिकल डेटा द्यावा; नाना पटोले यांची मागणी
Nashik Yeola Chilli farmers facing problems due to low rates in markets Mumbai