सातारा : अद्याप खरिपाच्या पेरणीला सुरवात झाली नसली तरी शेतकऱ्यांनी सर्वतोपरी तयारी केली आहे. (Kharif Sowing) पेरणीसाठी आवश्यक असलेल्या (Bogus Seed) बियाणांमध्ये आणि खतामध्ये बनावटपणा आढळून आल्यास केवळ फौजदारी गुन्हेच नाहीतर कडक कारवाई करुन शेतकऱ्यांची लूट थांबवण्याच्या सूचना राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज्यात सध्या (Monsoon) मान्सूनचे आगमन झाले असले तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरुन न जाता अपेक्षित पाऊस झाल्यावर पेरणीचा श्रीगणेशा करण्याचा सल्ला दिला आहे. राज्यात खत आणि बी-बियाणे विक्रीमध्ये अनेक ठिकाणी अनियमितता आढळून आली आहे. मात्र, कृषी विभागाने केलेली कारवाई ही कौतुकास्पद असून कोणत्याही परस्थितीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याबाबत कृषी विभागाला सूचना करण्यात आल्या आहेत.
सध्या पाऊस लांबणीवर गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे नेमकी पेरणी करावी की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अशा परस्थितीमध्ये राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी सातारा जिल्ह्यातील वाढे गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तर 70 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणीला सुरवात करु नये. खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या तरी उत्पादनात फरक पडणार नाही. त्यामुळे पेरण्या उशीरा झाल्या तरी कमी कालावधीचे सोयाबीन वाण वापरल्यास उत्पादनावर कोणताही परिणाम होणार नाही. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार पेरणीचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राज्यात खरिपाच्या बी-बियाणे आणि खत विक्रीला सुरवात होताच बोगस बियाणे समोर येत आहे. यावर अंकूश घालता यावा यासाठी कृषी विभागाने तालुकानिहाय भरारी पथकाची नेमणूक केली आहे. बियाणे विक्रीचा परवाना, खताचा साठा शिवाय लिंकिंगची जबरदस्ती यासारख्या बाबीवर कृषी विभागाचे लक्ष असून अनियमितता आढळून आल्यास केवळ फौजदारी गुन्हेच नाही तर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नांना कृषी मंत्र्यांनीच उत्तरे दिल्याने प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यंदा पेरणीला उशीर झाला असला तरी त्याचा उत्पादनावर परिणाम होणार नाही आणि खर्चही वाया जाणार नाही अशी काळजी घ्यावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी घाईगडबडीत पेरणी केली तर पुन्हा दुबार पेरणीचे संकट ओढावरणार आहे. त्यामुळे खरिपातील पेरण्या 15 जुलैपर्यंत केल्या तरी उत्पादनावर परिणाम होणार नाही. अधिकचा खर्च टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी घरच्या सोयाबीन बियाणाचा वापर करण्याचा सल्लाही मंत्री भुसे यांनी दिला आहे.