जुन्नर : शेती ही निसर्गावर अवलंबून असली तरी बदलत्या निसर्गाच्या चक्राबरोबर (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल केला तर काय होऊ शकते हे जुन्नर तालुक्यातील रोहकडीच्या शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. पारंपरिक पिकांना तर त्यांनी केव्हाच फाटा दिला आहे. शिवाय फळबागांच्या मोहातही न पडता (Vegetable) भाजीपाल्यातून उत्पन्नात भरघोस वाढ केली आहे. (Bitter gourd) कारले, चवीला कडू असले तरी रोहकवाडीच्या रवींद्र घोलप यांना उत्पन्नाच्या माध्यमातून त्याचा गोडवा लक्षात आला आहे. त्यामुळेच त्यांनी एक एकरात कारल्याची लागवड केली होती. आता याच कारल्याला जागेवर 35 रुपये किलो असा दर मिळत आहे. शिवाय भविष्यात दरात वाढ ही निश्चित मानली जात आहे. सध्या मुख्य शेतीमलाच्या दरात घट तर भाजीपाल्याला विक्रमी दर मिळत आहे. टोमॅटो 70 रुपये तर कारले 60 रुपये किलो असे बाजारपेठेतले चित्र आहे.
उत्पादन वाढीसाठी शेतकरी एक ना अनेक प्रयोग करीत आहेत. मात्र, भाजीपाल्याकडे शेतकरी दुर्लक्ष करतात. मात्र, रवींद्र घोलप यांनी मुख्य पिकांचे दर आणि सध्याचे भाजीपाल्याचे मार्केट यामधील दरी ओळखून घोलप यांनी केवळ एका एकरात कारल्याची लागवड केली होती.केवळ लागवडच नाही सेंद्रिय पध्दतीने कारल्याची जोपासना केली. रासायनिक खतांचा मारा नाही. केवळ सेंद्रिय पध्दतीने कारल्याची जोपसणा केल्याने त्याला अधिकचा दर मिळत आहे. घोलप यांच्या शेतावर व्यापारी हजेरी लावून जागेवर 30 ते 35 रुपये किलो असा दर मिळत आहे.
केवळ लागवड करुन उत्पादन पदरी पडले असे नाही तर घोलप यांनी तीन महिने अथक परिश्रम आणि योग्य नियोजन करुन त्यांनी ही किमया साधली आहे. निसर्गाचा लहरीपणा असताना पाण्याचे योग्य नियोजन आणि खताचा डोस यामुळे हे साध्य झाले आहे. या दरम्यानच्या काळात घोलप यांनी इतर कोणत्याही पिकांची लागवड केली नाहीतर केवळ कारल्याचे उत्पादन वाढीवर भर देण्यात आला होता. सध्या बाजारपेठेत कारल्याची आवक सुरु असून पावसाळ्यात आणखीन दर वाढतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुख्य पिकांतून जी किमया साधली जात नाही ते भाजीपाल्यातून घोलप यांनी करुन दाखवलं आहे. एक एकरावरच त्यांनी कारल्याची लागवड केली तरी त्याचे योग्य नियोजन हेच उत्पादनवाढीचे गमक राहिले आहे. कारल्याला अधिकचा दर असतोच पण आता पावसाळ्याच्या तोंडावर दरात वाढ झाल्याने घोलप यांना अधिकचा फायदा झाला आहे. आता कारल्याचे पीक दरवर्षी घेतले जाणार असल्याचा निर्धार घोलप यांनी केला आहे.