अहमदनगर | मनोज गाडेकर | १० सप्टेंबर २०२३ | श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याच्या पेरूला ६० रुपये प्रतिकिलो भाव मिळालाय.जिल्ह्यातील इतर बाजार समितीत २५ ते ३० रुपये होलसेल दर मिळत होता, मात्र श्रीरामपूर येथे ६० रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्याने आनंद व्यक्त केला आहे. श्रीरामपूर येथील प्रगतशील शेतकरी मनोजकुमार आगे यांनी पारंपारिक पिकांऐवजी सेंद्रीय पध्दतीने पेरू पिकाची लागवड केली. योग्य नियोजनामुळे पेरूच्या झाडांना आलेल्या चांगल्या दर्जाच्या आणि चविष्ट पेरूला श्रीरामपूर बाजार समितीत उच्चांकी ६० रुपये किलो होलसेल भाव मिळाला आहे. इतर बाजार समितीपेक्षा पेरूला मिळालेला हा चांगला बाजारभाव मानला जात आहे.
सेंद्रीय फळं पिकवणे हे तसं सोपं नाही, पण अगदी रुचकर आणि नैसर्गिक फळांची चव चाखायची असेल, तर सेंद्रीय फळांचीच निवड करा. सेंद्रीय फळं अतिशय रसाळ आणि नैसर्गिक गोड असतात. यावर कोणतीही प्रक्रिया नसते, केमिकल्सचा वापर नसतो, त्यामुळे आरोग्यासाठी ही फळं अतिशय महत्त्वाची असतात, कोणताही धोका तुमच्या शरीराला नसतो, कॅन्सर सारखे आजार तर या कारणावरुन जवळपासही येणार नाहीत, हे नक्कीच असतं. तसंच यातलं एक नैसर्गिक म्हणजेच सेंद्रीय पद्धतीने घेतलेलं फळ हे पेरु आहे, या पेरुला अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या बाजारपेठेत प्रति किलो ६० रुपयांचा भाव मिळतोय.
सेंद्रीय फळ आणि धान्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी सध्या अशा प्रकाराची पिकं आणि फळबागा वाढवण्यावर भर देत आहेत. यामुळे आरोग्याला तर मोठा फायदा होणारच आहे, शिवाय शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळणार आहे, अशा प्रकारच्या धान्य आणि फळांना परदेशात जास्त मागणी आहे, पण याचं उत्पन्न हवं तेवढं अजूनही घेतलं जात नसल्याने, अशा धान्य आणि फळांना चांगलाच भाव आहे.
यापूर्वी डाळिंब फळाला देखील चांगला भाव मिळाला होता. अजूनही डाळिंबाचा भाव ५०० रुपयांच्या खाली आलेला दिसत नाही, निर्माण झालेल्या नैसर्गिक परिस्थितीमुळे उत्पन्न कमी झाल्यावर आवक कमी होते, आणि भाव वाढतात असा आतापर्यंतचा भाववाढीचा आलेख आहे. टोमॅटोचा भाव देखील सुरुवातीला खूप वाढला, पण भाववाढीनंतर लागवड मोठ्या प्रमाणात झाल्याने टोमॅटोचे भाव देखील खाली आले. यामुळे ज्या पिकाचा फळाचा भाव अधिक वाढलेला असतो, त्याची लागवड लगेच करणे, बाजारपेठेत भाव मिळवण्याच्या दृष्टीकोनातून धोक्याचे असते.