मुंबई : देशासह महाराष्ट्रातही आता (Lumpy Diseases) जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातील 21 जिल्ह्यांमधील 338 गावातील 2 हजार 664 गाई आणि बैलांना या आजाराचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत (Maharashtra) राज्यात धोका कमी होता. पण गेल्या दोन दिवसांपासून प्रादुर्भाव वाढत असून लम्पी रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास येताच शेतकऱ्यांनी किंवा संबंधित संस्थेने ती माहिती (Department of Animal Husbandry) पशूसंवर्धन विभागाला देणे गरजेचे आहे. जो कोणी माहिती लपून ठेवेल त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पशूसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे. अनेक शेतकरी माहिती असून त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे धोका अधिकच वाढत जातो. लम्पी रोगाची लागण होताच वेळीच उपचार झाले तर हा रोग अटोक्यात येत असल्याचे पशूसंर्धन विभागाने स्पष्ट केले आहे.
नाही म्हणलं तरी राज्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव दिवसागणिस वाढू लागला आहे. 21 जिल्ह्यातील 2 हजार 664 जनावरांना याची लागण झाली आहे. राज्यात 2020-21 मध्ये लम्पी रोगाचा शिरकाव झाला होता. त्यावर्षी 26 जिल्ह्यात जनावरे आढळून आली होती. 2021-22 ला 10 जिल्ह्यातील जनावरांना या रोगाची लागण झाली होती. या दोन्ही वर्षात जनावरे दगावण्याचे प्रमाण हे कमी होते.
लम्पी रोगावर नियंत्रण मिळवायचे म्हटलं तर शेतकऱ्यांची भूमिका आणि लसीकरण हे दोनच पर्याय आहेत. राज्यात आतापर्यंत 5 लाख 15 हजार 120 जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. तर 5 किलोमीटरच्या अंतरावरील 14 लाख 49 हजार 741 जनावरांचे लसीकरण करायचे आहे. राज्यात 16 लाख 38 हजार 800 जनावरांचे लस उपलब्ध आहेत. आणखी 5 लाख लस उपलब्ध झाल्या तर लसीची कमतरता भासणार नसल्याचे पशूसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले आहे.
लम्पी हा संसर्गजन्य आजार आहे. जनवारांच्या गोठ्यातील माशी, गोमाशी, ढास, घाण यामुळे या आजाराची लागण होते. लागण झालेली माहितीच पशूसंवर्धन विभागाला दिल्यास योग्य ती उपाययोजना केली जाते. दुर्लक्ष झाले तर धोका हा वाढणारच आहे. शिवाय “प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, 2009 मधील कलम 4 (1) नुसार पशुमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी ही माहिती नजिकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे. माहिती न दिल्यास आता कारवाई करण्यात येणार आहे.