जळगाव : दरवर्षी जनावरांमध्ये (Lumpy Skin) लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव हा ठरलेलाच आहे. राज्यात गेल्या महिन्यापासून या (Infectious diseases) संसर्गजन्य आजाराच्या संख्येत वाढ होत असून आतापर्यंत यामुळे 22 जनावरांचा मृत्यूही झाला आहे. विशेष म्हणजे ह्या जनावराच्या आजाराची लागण आता माणसालाही झाल्याचे समोर आले. भविष्यात याकडे दुर्लक्ष झाले तर आणखी धोका वाढेल असा इशाराच (Department of Animal Husbandry) पशूसंवर्धन विभागाने दिला आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना हा एकमेव पर्याय असून प्रत्येक शेतकऱ्याने लम्पी स्कीनच्या बाबतीत गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
लम्पी स्कीन हा एक संसर्गजन्य आजार आहे. या गोठ्यातील गोचिड, माश्या, टिक्स यांच्या मार्फत या लम्पी आजाराची लागण होते. राज्यात 6 सप्टेंबरपर्यंत 22 जनावरे यामुळे दगावली आहेत. यामध्ये जळगाव जिल्ह्यात 12, नगर जिल्ह्यात 3, पुणे जिल्ह्यात 3, बुलढाणा 1 तर अमरावती जिल्ह्यामध्ये 3 अशी जनावरे दगावली आहेत. यावर नियंत्रण मिळावे त्याअनुशंगाने उपाययोजना सुरु आहेत. शिवाय पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी या रोगावर नियंत्रण मिळावे त्या दृष्टीकोनातून प्रयत्नशील आहेत.
जनावरांच्या गोठ्यातील गोचिड, माश्या, टिक्स यांच्या मार्फत या लम्पी आजाराची लागण होते. यामुळे जनावरास ताप येतो तर जनावराच्या डोके, मान, पाय, छाती, पाठ, कास येथील त्वचेवर ते 5 से.मी. व्यासाच्या गाठी येतात. पायावर सूज आल्याने जनावर लंगडते. एवढेच नाहीतर यामुळे जनावराची तहान-भूक कमी होऊन दुध उत्पादनावरही त्याचा परिणाम होतो.
सर्वात महत्वाचे म्हणजे लम्पी स्कीनचा प्रादुर्भावच होऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याकरिता ज्या जनावराला या आजाराची लागण झाली आहे त्यापासून इतर जनावरे ही दूर ठेवणे गरजेचे आहेत. शिवाय जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा लागणार आहे, गोठ्यामध्ये कपारी नसायला पाहिजेत जेणेकरुन यामध्ये माशा, गोमाश्या बसणार नाहीत, याची काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागणार आहे. जनावरांना कोणत्याही कागदपत्राशिवाय लस दिली जाते, त्यामुळे पशूपालकांनी योग्य वेळी ही लस दिली तर धोका टळणार आहे.
राज्याचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनावरांवरील लंम्पी स्कीन आजाराच्या संदर्भात जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या खिरोदा गावात पाहणी केली. मंत्री विखे पाटलांनी लंपी स्कीनग्रस्त जनावरांची पाहणी करून शेतकऱ्यांची संवाद साधला. शिवाय याचा प्रादुर्भाव वाढणार नाही त्याअनुशंगाने संबंधित विभागालाही सूचना दिल्या आहेत.