गोंदिया : जुलैच्या पहिल्या दिवसापासून राज्यात पावसाने हाहाकार घातला आहे. (Vidarbha Farmer) विदर्भावर पावसाची कधी नव्हे ती अधिकची कृपादृष्टी राहिलेली आहे. त्यामुळे हा पाऊस नुकसानीचा ठरलेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही प्रमाणात पावसाने उसंत घेतली असली तरी ढगाळ वातावरण रिमझिम पाऊस हा सुरुच आहे. यामुळे धोका अद्यापही टळलेला नाही. मध्यंतरी सलग 15 ते 20 दिवस झालेल्या पावसामुळे (Kharif Season) खरिपातील पिके तर वाहून गेलीच आहेत पण शेत जमिनीही खरडून गेल्याचे चित्र गोंदिया जिल्ह्यात आहे. कृषी विभागाकडून आता पीक पाहणी आणि पंचनाम्याला सुरवात झाली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये तब्बल 208 हेक्टरावरील (Paddy Crop) धान पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शिवाय 8 दिवसांमध्ये या संदर्भातला अहवाल तयार होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
खरीप हंगामातील काही क्षेत्रावर धान पिकांची लागवड करताच पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे पिकांची पाहणी करणेही शक्य नव्हते. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने कृषी विभाग कामाला लागला आहे. जिल्ह्यात नुकसान झालेल्या क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे. कृषी विभागाचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत आहेत. आतापर्यंतच्या पाहणीतून धान पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. आता प्रत्यक्ष पंचनाम्याला सुरवात झाली असून आर्थिक मदत मिळे असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.
विदर्भात दरवर्षी कमी पावसामुळे धान पिकाची लागवड होत नाही. पण यंदा चित्र बदलले आहे. हंगामाच्या सुरवातीलाच पावसाने असे काय थैमान घातले आहे त्यामुळे लागवड झालेल्या क्षेत्रातील पिकांवर पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे वाढ तर खुंटलीच आहे पण सततच्या पावसामुळे पाण्याचा निचराही होत नाही. हंगामाच्या सुरवातीलाच सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने उत्पादन घटण्याचा धोका कायम आहे. पंचनाम्यांना सुरवात झाली असून मदतीबाबत शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.
धान पीक हेच खरिपातील मुख्य पीक आहे. अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी लागवड केली मात्र, काही क्षेत्रात लागवड होताच सुरु झालेला पाऊस हा सलग 20 दिवस कायम राहिला. त्यामुळे जिल्ह्यातील 208 हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. शिवाय आणखी वाढ होईल असाही अंदाज कृषी विभागाचा आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदा विदर्भातील शेतकऱ्यांनाही बसलेला आहे. शेतकऱ्यांना आता आर्थिक मदतीची प्रतिक्षा आहे.