गडचिरोली : धान कापणी होऊन दीड महिना उलटला तरी जिल्ह्यात (Paddy Procurement Centre) धान खरेदी केंद्र ही सुरु झाली नसल्याने धान उत्पादकांची मोठी अडचण झाली होती. यातच गेल्या काही दिवसांपासून (Climate Change) वातावरणात बदल होऊन पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. अशा परस्थितीमध्ये शेतावर साठवणूक केलेल्या (Paddy Crop) धानाचे काय असा सवाल उपस्थित होत असताना आदिवासी महामंडळाकडून धान खरेदीला सुरवात करण्यात आली आहे. त्यामुळे धान विक्रीबाबतची चिंता मिटली असून खरेदीची क्षमताही वाढविण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उशिरा का होईना महामंडळाने घेतलेली भूमिका शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे. गुरुवारपासून खरेदी केंद्र सुरु झाल्याने पिकांची नोंदणी आणि इतर प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांची एकच गर्दी झाली होती.
धान पीक हेच विदर्भातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. याच पिकावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते शिवाय खरेदी केंद्र सुरु झाल्यालवरच शेतकऱ्यांना पिकाच्या बदल्यात योग्य मोबदला मिळतो. पण गेल्या दीड महिन्यापासून धान खरेदी केंद्र ही बंद राहिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे किमान पावसाळ्यापूर्वी तरी खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. वेळप्रसंगी शेतकऱ्यांनी जिल्ह्यात जागोजागी चक्काजाम आंदोलनेही केली होती. शेतकऱ्यांची मागणी आणि तोंडावर आलेला पावसाळा पाहता अखेर खरेदी केंद्र सुरु झाली आहेत.
धान खरेदी केंद्रच सुरु होऊन उपयोग नाही तर यंदा धानाची वाढेलेली उत्पादकता लक्षात घेता केंद्रावरील मर्यादाही वाढविण्यात येण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. या मागणीला अखेर यश आले आहे. कृषी विभागाकडून धान पिकाची उत्पादकता पाहून ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शिल्लक धानाचा विषय राहणार नाही आणि शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे माल विक्री करण्याची नामुष्की ओढावणार नाही. आदिवासी महामंडळाने उशिरा निर्णय घेतला असला तरी त्यामध्ये आवश्यक ते बदल केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
गुरुवारपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी आदिवासी महामंडळाने खरेदी केंद्र उभारुन शेतकऱ्यांची सोय करण्याचा प्रय़त्न केला आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. धान विक्रीसाठी शेतकऱ्यांना सातबारा उतारा, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आदी कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. त्यानंतर केंद्रावरुन एसएमएस आल्यावर आपले धान घेऊन यावे लागणार आहे. पावसाळ्याचे तोंडावर खरेदी केंद्र सुरु झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान टळले आहे.