मुंबई : शेती व्यवसयाशी निगडीत सर्वच बाबींवर अवकाळी पावसाचा परिणाम झालेला आहे. एकीकडे शेतात उभ्या असलेल्या पिकांवर किड, रोगराई वाढत आहे तर दुसरीकडे काढणी झालेल्या भाजीपाल्यावरही परिणाम होत आहे. अवकाळी पावसामुळे ( Mumbai vegetable market) मुंबई बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक कमी झाली असून दर हे वाढलेले आहेत. याचा थेट फायदा हा शेतकऱ्यांना नाही तर किरकोळ विक्रेत्यांनाच होत आहे. दराबाबत कुणाचेच नियंत्रण नसल्यामुळे किरकोळ विक्रेत्ये जे ठरवतील तोच दर ग्राह्य मानला जात आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिकचे पैसे तर मोजावे लागत आहेत पण दुर्देव म्हणजे हे उत्पाकदाकांच्याही पदरी पडत नाहीत.
मालाची आवक घटली की दर वाढणार हे बाजारपेठेचे सुत्रच आहे. पण त्यामुळे शेतकऱ्यांना तरी फायदा होणे अपेक्षित असते मात्र, येथील बाजारपेठेत किरकोळ विक्रेतेच अधिकचा लाभ घेत आहेत. मुंबई एपीएमसी भाजीपला मार्केटमध्ये आज 580 गाड्याची आवक झाली असून टोमॅटो 50 रुपये तर वाटाणा 100 रुपये किलो विकला जात असून इतर भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.
मध्यंतरीच्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकासह भाजीपाल्याचेही नुकसान झाले होते. तेव्हा झालेल्या नुकसानीचा परिणा आता बाजारपेठेत जाणवत आहे. कारण टोमॅटो, वटाणा याची मागणी होत असतानाही त्या तुलनेत पुरवठा होत नाही. त्यामुळे दरात वाढ होत आहे. मात्र, दर वाढीचा मलिदा हा मध्यस्तीच घेत आहेत. शेतकऱ्यांकडून तर नियमित भावातच भाजीपाल्याची खरेदी केली जात आहे. मात्र, बाजारपेठेत आवक कमी झाल्याचे भासवत अधिकच्या दराने भाजीपाल्याची विक्री केली जात आहे.
सध्या अवकाळी पावसाने उसंत घेतली असली तरी मध्यंतरीच्या वातावरणातील बदलाचा आणि पावसाचा परिणाम हा भाजीपाल्याच्या आवकवर पर्यायाने दरावरही झालेला आहे. मुंबई बाजारपेठेत पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून भाजीपाल्याची आवक होते. पावसानं हजेरी लावल्याने पश्चिम महाराष्ट्रातून बाजारपेठेत येणाऱ्या मालाची आवक घटली आहे. त्यात प्रामुख्याने वाटाणा आणि टोमॅटोचा समावेश आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. मुंबई बाजार समितीमधील आजचे बाजारभाव शिमला 20, भेंडी 6, फ्लावर 12, टोमॅटो 50, वाटाणा 100, मिरची 20, कोबी 12 वांगी 10, कारली 16 रुपये प्रतिकिलो तर कोथिंबीर १५ आणि मेथी ८ रुपये जुडी होती.
इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च हा वाढला आहे. त्यामुळेही भाजीपाला महागल्याचे व्यापारी सांगत आहेत. पण किरकोळ विक्रेतेच भाजीपाल्याचा दर ठरवत आहेत. यावर कुणाचाच अंकूश राहिलेला नाही. त्यामुळे दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना नव्हे तर शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये असलेल्या मध्यस्तीलातच होत आहे. शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी केल्यानंतर त्यामध्ये दुप्पट, तीप्पट वाढ करुन ग्राहकांना भाजीपाला विकला जात आहे.