नांदेड : मुख्य पिकांतून शेतकऱ्यांचे नुकसान झाले तरी हे नुकसान (Seasonable Crop) हंगामी पिकातून भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वकष प्रयत्न केले आहेत. असे असतानाही शेतकऱ्यांसमोरील समस्या ह्या कायम आहेत. मुख्य हंगामातील पिकांच्या (Production Decrease) उत्पादनात घट झाली तर आता हंगामी पिकांची बाजारपेठेत आवक सुरु होताच दरात घसरण होत आहे. त्यामुळे काहीही झाले तरी नुकसान हे शेतकऱ्यांचेच होतेय. हंगामी पिकातून उत्पन्न वाढेल अशी आशा शेतकऱ्यांना असतानाच (Onion Rate) कांद्याला 1 रुपया किलो तर कलिंगडही 2 रुपये किलोने विक्री करण्याची नामुष्की ओढावली आहे. यामुळे अधिकचे उत्पन्न तर सोडाच पण शेतकऱ्यांनी केलेला खर्चही यामधून निघत नाही.
अर्धापूर तालुक्यातील पांगरी येथील शेतकरी विठ्ठल सोनवणे यांनी तीन एकरात कलिंगडाची लागवड केली होती. लागवडीपासून ते काढणीपर्यंत सव्वालाखाचा खर्च केला. परंतु कलिंगड काढणीला सुरुवात झाली की दरात मोठी घट झाली. कलिंगड खरेदीदार मिळत नसल्याने पीक शेतातच नासाडी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कलिंगडला चांगला बाजारभाव मिळून दोन पैसे हातात येतील या आशेने पांगरी येथील सोनवणे कुटुंब दिवसरात्र एक करून कलिंगडाचे संगोपन केले त्यांच्या कष्टाला यशही मिळाले मात्र बाजारपेठेत भाव मिळाला नाही. तीन एकरातील कलिंगडाची अक्षरशः शेतात नासाडी होत असल्याचे दिसून येत आहे.
रात्रंदिवस काबाड कष्ट करून पीक जोमात आणले. यासाठी शेतकऱ्यांना अविरत प्रय़त्न करावे लागतात. त्याचा मोबदला मिळण्यागोदरच शेतात पिकाची नासाडी होताना पाहावत नाही. जोमात आलेलं पीक डोळ्यासमोर नासाडी होत असताना शेतकऱ्यांच्या मनावर काय परिणाम होत असे ही व्यथा त्या शेतकऱ्यालाच ठाऊक असते अशी प्रतिक्रिया कलिंगड उत्पादक शेतकरी विठ्ठल सोनवणे यांनी दिली आहे. त्यामुळे कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी दरातील मोठी तफावत याचा फटका शेतकऱ्यांनाच बसत आहे.
वर्षभर अवकाळी आणि सततच्या पावसामुळे खऱिपासह रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे हंगामी पीक म्हणून शेतकऱ्यांनी कलिंगडाची लागवड केली होती. यंदा बाजारपेठ खुली असल्याने कलिंगड उत्पादकांना अच्छे दिन येतील अशा आशावाद होता. शिवाय हंगामाच्या सुरवातीला कलिंगडला 15 ते 16 रुपये किलो याप्रमाणे विकी झाली होती. पण आता हेच कलिंगड 2 ते 3 रुपये किलोंवर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे कांदा उत्पदाकांच्या डोळ्यात पाणी तर कलिंगडची लालीही कमीही झाली आहे.