पुणे : कोरोनाची दुसरी लाट, घसरलेले भाव आणि अळी, किटकांचा प्रादुर्भाव या सर्व गोष्टींमुळे राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पुण्यातील इंदापुरातील शेतकऱ्यांची परिस्थीती तर अधिक चिंताजनक आहे. मागील चार महिन्यांत चांगले दर मिळालेल्या टोमॅटोचा भाव कोरोना आणि लॉकडाऊनच्या भीतीने चांगलाच कोसळला आहे. व्यापारी कवडीमोल दराने टोमॅटोची खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच माशी आणि अळीचाही पिकावर मोठा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. याच कारणांमुळे इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथील एका शेतकऱ्याने उद्विग्न होऊन दीड एकरातील टोमॅटोचे पीक काढून टाकले आहे. सध्या 1 ते 5 रुपये प्रतिकिलो असा दर मिळत असल्याने शेतकऱ्याने हे पाऊल उचलले आहे . (Pune Indapur farmer removed Tomato crop from his farm due to low price and infestation of larvae lockdown corona )
कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर आता कोरोनाची दुसरी लाटसुद्धा शेतकऱ्यांसाठी तितकीच दाहक ठरत आहे. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या भीतीमुळे फळभाज्या तसेच इतर पिकांचे भाव गडगडले आहेत. पुण्यातील इंदापुरातील शेतकरीसुद्धा यामुळे त्रस्त आहेत. मागील चार ते पाच महिन्यांत टोमॅटोला चांगला भाव मिळाला होता. या काळात शेतकऱ्यांना चांगली नफा झाला. मात्र लॉकडाऊन, कोरोना या संकटानंतर आता येथे माशी आणि अळ्यांनी टोमॅटो पिकावर हल्ला सुरु केला आहे. इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव या गावातील शेतकरी महादेव खबाले यांनी लावलेल्या टोमॅटो या पिकाला अळ्या आणि माशांचा चांगलाच फटका बसला आहे. पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस झाल्यामुळे त्यांनी उद्विग्न होऊन आपल्या दीड एकर शेतातील टोमॅटोची सर्व झाडं चक्क तोडून फेकून दिली आहेत.
शेततील टोमॅटोचे पीक काढून फेकल्यानंतर महादेव खबाले यांना याविषयी विचारण्यात आले. आपल्या या निर्णयाबद्दल बोलताना त्यांनी टोमॅटो लावल्यानंतर मोठे कष्ट घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच औषध फवारणी, खत, पाणी असा मोठा खर्चसुद्धा त्यांनी केला. मात्र, ऐनवेळी लॉकडाऊन, कोरोनामुळे टोमॅटोचे भाव घसरले. त्याबरोबरच माशा आणि अळी यांच्या हल्ल्यामुळे टोमॅटोचे पीकसुद्दा नष्ट झाले. माशा आणि अळ्यांचा पिकावरील हल्ला आटोक्यात आला नाही. त्यामुळे सर्व पिकाची नासधूस झाली. याच कारणामुळे शेतातील टोमॅटो काढून टाकल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोनाच्या संसर्गामुळे बाजारपेठेवर झालेले परिणाम, तसेच अशा प्रकारच्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी चांगलाच संकटात सापडल्याचे बोलले जात आहे. यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचीही मागणी यावेळी केली जात आहे.
इतर बातम्या :
PM-Kisan: केंद्र सरकारद्वारे ‘या’ शेतकऱ्यांकडून 261 कोटींची वसुली, कारण काय?
आई-वडिलांना बनवायचे होते IAS-IPS,जिद्दीने सुरु केली शेती आणि आता वर्षाला कमावतो 80 लाख रुपये
(Pune Indapur farmer removed Tomato crop from his farm due to low price and infestation of larvae lockdown corona )