पुणे : खरीप हंगामाच्या अनुशंगाने जिल्हानिहाय (Kharif Season) हंगामपूर्व आढावा बैठका पार पडत आहेत. या दरम्यान, खरीप हंगामासाठीचे सरासरी क्षेत्र , पेरणीसाठी बियाणे आणि खत पुरवठा यासारख्या बाबींचा आढावा घेतला जातो. त्याचअनुशंगाने (Pune) पुणे येथे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) अजित पवार यांनी बैठक घेतली. खरीप हंगामात ना बियाणांचा तुटवडा भासेल ना खताचा. तशा प्रकारचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. शेतकऱ्यांनी फक्त एकाच खताचा हट्ट करु नये कृषी विभागाने ज्या सूचना जारी केल्या आहेत त्या पध्दतीने जरी पेरा झाला तरी तो उत्पादन वाढीसाठीच असेल. यंदाच्या हंगामात खत-बियाणांची चिंता करु नका तुम्ही फक्त उत्पादन आणि उत्पन्न वाढीवर लक्ष केंद्रीक करा असा सल्ला त्यांनी आढावा बैठकी दरम्यान दिला आहे. खरिपाचे सरासरी क्षेत्र आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या बियाणे आणि खताचाही आढावा बैठकी दमरम्यान घेण्यात आला होता.
खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शिवाय यंदा खताची टंचाई भासेल असे सांगितले जात आहे. पण शेतकऱ्यांनी खत आणि बियाणांबाबत निश्चिंत राहून उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रीत करावे. जिल्ह्यात 27 हजार 600 क्विंटल बियाणे हे मुख्य पिकांसाठी लागते. यामध्ये भात,मका, बाजरी, सोयाबीन,भुईमूग या पिकांचा समावेश असतो. असे असताना सध्या 15 हजार 125 क्विंटल बियाणे हे शिल्लक आहे. त्यामुळे बियाणांची तर चिंता ना्ही शिवाय खतही हंगाम सुरु होण्यापूर्वीच पुरविले जाणार आहे. गतवर्षी 2 लाख 15 हजार मेट्रीक टन एवढ्या खताची मागणी होती. त्यामधील 74 हजार 368 मेट्रीक टन शिल्लक आहे. त्यामुळे खत आणि बियाणांची चिंता करण्याचे कारण नसल्याचे पवार यांनी बैठकीत सांगितले आहे.
सध्या खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाला सुरवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील 4 लाख 10 हजार खातेदारांना तब्बल 4 हजार कोटींचे कर्ज वितरीत केले जाणार आहे. या कर्जाचा उपयोग याच खरीप हंगामात व्हावा या दृष्टीकोनातून नियोजन केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. खरीप पीक कर्ज वाटपाला सुरवात झाली आहे. शेतकऱ्यांना कर्जाचा वापर आणि उद्देश समजावा याच दृष्टीकोनातून लवकर वाटपास सुरवात झाली आहे.
खरीप हंगामात बियाणे, खते आणि पीककर्ज हे वेळेत शेतकऱ्यांना मिळाले तरच उत्पादन वाढणार आहे. यामध्ये बॅंका आणि कृषी अधिकारी यांचे मोठे योगदान असून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ कशी होईल यासाठीच प्रयत्न असणे गरजेचे आहे. त्याच अनुशंगाने कृषी अधिकाऱ्यांनी कामाला लागावे आणि शेतकऱ्यांनीही गतवर्षी झालेले नुकसान कसे भरुन काढता येईल यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.