यवतमाळ : खरीप, फळबागानंतर आता रब्बी हंगामातील पिकांवरही अवकाळीची अवकृपा ही कायम राहिलेली आहे. पीक पदरात पडण्यापूर्वीच (Unseasonable Crop) अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने (Yavatmal) जिल्ह्यातील महागाव तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्वारी हे (Rabi Season) रब्बी हंगामातील मुख्य पीक असले तरी यंदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे तर दुसरीकडे आता अवकाळी पावसाची अशी ही अवकृपा. त्यामुळे उत्पादनात घट तर होणारच आहे पण आता शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी होत आहे. यंदा दोन्ही हंगामातील पिकांवर पावसाचा परिणाम झाला आहे.
रब्बी हंगामातील पोषक वातावरणाचा फायदा पिकांना झाला होता. वाढही जोमात झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादनाची अपेक्षा होती. एवढेच नाहीतर ज्वारी हे मुख्य पीक काढणीला आले असतानाच महागाव तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामध्ये काळी दौलत खान येथील अल्पभूधारक शेतकरी अमोल बगाटे या शेतकऱ्याच्या शेतातील दोन एकर ज्वारीचे पीक हे वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाले आहे. त्यामुळे चार महिन्याची मेहनत तर वाया गेलीच पण आर्थिक नुकसानही झाले आहे. खरिपात सुरु झालेली नुकसानीची मालिका आता रब्बीतही कायम आहे. त्यामुळे शासनाने पीक पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
ज्वारीची काढणी झाली की कडबा एकत्र करुन तो साठवला जातो. या कडब्याचाच आधार शेतकऱ्यांना पूर्ण वर्षभर असतो. मात्र, यंदा गंजी लावल्या की लागलीच झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे चारा पिकाचेही नुकसान झाले आहे. कडबाही भिजल्याने आता ते जनावरांना खाण्यायोग्य राहिलेला नाही. त्यामुळे न भरुन निघणारे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
महागाव तालुक्यातील काळी दौलत खान येथील अमोल बगोटे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. असे असताना त्यांनी वर्षभर रोजी-रोटीचा प्रश्न मिटावा आणि जनावरांना चाराही उपलब्ध व्हावा या उद्देशाने ज्वारीची पेरणी केली होती. सर्वकाही सुरळीत असताना एका रात्रीतून होत्याचे नव्हते झाले आहे. त्यांची 2 एकरातील ज्वारी ही भुईसपाट झाली आहे. त्यामुळे नुकसानभरपाई मिळाली तरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.