सोलापूर – राज्यात सध्या शेतकऱ्यांच्या वीजेचा (Electricity connection) प्रश्न ऐरणीवर आला असून वीज कनेक्शन तोडणे , डीपी बंद करणे , फ्यूज काढून नेणे याविरोधात शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी लढा उभा करण्याचा निर्धार केला आहे. एमएसईबीचे आम्ही देणे लागत नाही. मुंबई उच्च न्यायालयाने वीज कनेक्शन तोड नका अशी ऑर्डर केलेली आहे. तरीही एमएससीईबीचा आगाऊपणा सुरू असून त्याविरोधात संघर्ष उभा करत असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक जिल्ह्यातील थकीत वीजबिले असलेल्या शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कापली आहेत, त्यामुळे दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्यावरूनच आता शेतकरी नेते चांगलेच आक्रमक झाले आहे. गेल्या काही दिवसातली परिस्थिती पाहता, आधी कोरोना, लॉकडाऊन, पुन्हा दुष्काळ, पुन्हा अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशातच वीजबिलाची अव्वाच्या सव्वा रक्कल भरायची कुठून असा प्रश्न बळीराजासमोर उभा राहिला आहे.
बसुलीला आलेल्या कर्मचाऱ्यांना झटके बसणार
गेल्या काही दिवसात झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची वीजबिलं थकली आहे, त्यामुळे एमएससीबीने कारवाईचा बडगा उगारत कनेक्शन कापणीला सुरूवात केली आहे. अशावेळी वसुलीला येणाऱ्या एमएसईबी अधिकारी , कर्मचाऱ्यांना आता झटके बसणार आहेत. त्यांना जशाच्या तसे उत्तर दिले जाईल. असा गर्भित इशारा देखील यावेळी शेतकरी संघटना नेते रघुनाथ पाटील यांनी दिला आहे.
काही शेतकरी संघटनेचे लोक शेतकऱ्यांना एमएससीबीचे पैसे भरायला लावतात ते शेतकरी विरोधी आहेत. ते राजकीय पक्षाचे गुलाम झालेले आहेत.अशा संघटना मग काही संघटना भाजप ने पाळलेल्या आहेत. त्यांनी आमदार केलेले आहेत. काही राष्ट्रवादी , काँग्रेस आणि काही शिवसेनेने पाळलेल्या संघटना आहेत. कोण आज शेतकऱ्याच्या बरोबर आहेत हे शेतकऱ्यांनी ओळखले पाहिजे. शेतकरी संभ्रमित झाले आहेत. जायचं कुणाच्या मागे. त्यामुळे हा सगळा घोटाळा व्हायला लागला आहे. असे देखील शेतकरी संघटना नेते रघुनाथ पाटील यांनी यावेळी सांगितले.