औरंगाबाद : वेळेपूर्वी दाखल होणारा (Monsoon) मान्सून यंदा नियमित वेळेपेक्षा तीन दिवस उशीराने दाखल झाला. शिवाय आगमन होताच कोकणातच मान्सूनच्या मार्गक्रमणात अडथळा निर्माण झाल्याने पुन्हा चार दिवसाचा खंड. राज्यात पावासाचा लपंडाव सुरु असला तरी (Marathwada) मराठवाड्यात अजूनही पावसाची एंन्ट्रीच झालेली नाही. जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील काही भाग वगळता उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्वही पाऊस दाखल झालेला नाही. त्यामुळे पेरण्या तर सोडाच पण अजून शेत शिवारात (Pre-sowing cultivation) पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरु आहेत. त्यामुळे पेरण्या तर लांबणीवर पडणारच आहेत. पण अशा परस्थितीमध्येही शेतकऱ्यांनी घाईगडबडीत चाढ्यावर मूठ ठेऊ नये असाच सल्ला दिला जात आहे. मराठवाड्यात केवळ नांदेड जिल्ह्यातील काही भागात कापूस लागवड झाली आहे. अन्य भागात शेतकऱ्यांना अपेक्षित पावसाची प्रतीक्षा ही कायम आहे.
मान्सूनचे राज्यात आगमन झाले असले तरी पावसाची गती ही धिमी आहे. शिवाय त्यामध्ये सातत्य नसल्याने अजूनही पेरणीसाठी अपेक्षित पाऊसच झालेला नाही. उत्पादनाच्या दृष्टीने खरीप हंगामाच महत्वाचा असताना पावसाच्या या लहरीपणामुळे पेरणी करावी का नाही अशा सभ्रमात राज्यातील शेतकरी आहे. शिवाय कृषी आयुक्त धिरज कुमार यांनी 75 ते 100 मि.मी पावासाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करुन नये असा सल्ला दिला आहे. त्यामुळे बी-बियाणे खरेदी करुन ठवले असताना अजून जमिनीत गाढण्यासाठी किती वेळ वाट पाहावी लागणार अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
ज्या वेगाने 10 जून रोजी पाऊस तळकोकणात दाखल झाला तो वाऱ्याचा वेग कायम पुढे राहिलाच नाही. शिवाय पावसळ्यापूर्वी वाऱ्याचा वेगही यंदा मंदावलेला होता. म्हणजेच एप्रिल, मे महिन्यातील वाऱ्याच्या वेगाचा परिणाम आता सध्याच्या पावसावर होत असल्याचे कृषी हवामान तज्ञ डॉ. रामेश्वर साबळे यांनी सांगितले आहे. मे महिन्यात वाऱ्याचा वेग ताशी 7 ते 8 किमी असल्यास पावसामध्ये सातत्य राहते पण यंदा वाऱ्याचा वेग हा 1 ते 2 किमी असाच राहिला होता. त्यामुळेच जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचेही डॉ. साबळे यांनी सांगितले आहे.
खरिपाच्या पेरणीसाठी सतर्क असलेल्या शेतकऱ्यास प्रतीक्षा आहे ती अपेक्षित पावसाची. मात्र, मराठवाड्यात असून पावसाने सुरवातच केली नसल्याने पेरण्या लांबणीवर पडणार हे निश्चित मानले जात आहे. मराठवाड्यात सोयाबीन हे खरिपातील मुख्य पीक आहे. त्यामुळे चाढ्यावर मूठ ठेवण्यास उशीर झाला तर शेतकऱ्यांनी बियाणे वाणामध्ये बदल करणे अपेक्षित आहे. सोयाबीनमध्ये असेही बियाणे आहेत जी कमी कालावधीतीमध्येही अधिकचे उत्पादन देतात. यामध्ये जे एस -20034, जे एस 95-60, जेएस-93-05, पीडीकेयू अंबा, एनआरसी 142, एनआरसी 138 या वाणांचा समावेश होतो. त्यामुळे पावसाचा अंदाज आणि सातत्या हे पाहूनच शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवण्याचा सल्ला कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी दिला आहे.