कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात कोल्हापूरमधील जयसिंगपूर येथे 20 वी ऊस परिषद होणार आहे. जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानात ऊस परिषद होणार असून राजू शेट्टी ऊसदर, एकरकमी एफआरपी आणि पूरग्रस्तांच्या मदतीवरुन कोणती भूमिका घेतात याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. ऊस परिषद ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी महत्वाची मानली जाते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उद्या 20 वी ऊस परिषद जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानात होणार आहे. एफआरपी अधिक 200 ची पहिली उचल देण्याची मागणी राजू शेट्टी करण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी म्हणून आग्रही भूमिका घेतलीय. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी बाजारात साखरेचे दर वाढल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून एफआरपी अधिक 200 रुपयांची मागणी होण्याची शक्यता आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दराच्या आंदोलानाचं रणशिंग जयसिंगपूरच्या ऊस परिषदेतून फुंकलं जातं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि ऊस उत्पादक शेतकरी या परिषदेची आतुरतेनं वाट पाहत असतात. राजू शेट्टी ऊस परिषदेत जी भूमिका मांडतील त्याआधारे स्वाभिमानीकडून आंदोलन सुरु करण्यात येतं. यंदा पहिल्यांदाच गाळप हंगामाआधी साखरेचे दर वाढल्याने ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही राहणार असल्याचं कळतंय.
जुलै महिन्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसला होता. दोन्ही जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. महाराष्ट्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत तटपुंजी असल्यानं राजू शेट्टी यांनी पंचगंगा परिक्रमेचं आयोजन केलं होतं. त्यानंतर राज्य सरकारनं जाहीर केलेल्या मदतीवरुन देखील राजू शेट्टींनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे आता महापुराच्या तुटपुंज्या नुकसान भरपाई वरही सरकार विरोधात नव्याने एल्गार स्वाभिमानीतर्फे पुकारला जाण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या:
शेतकऱ्यांना टोपी घालण्यात मोदी पवार सारखेच, राजू शेट्टींनी बाह्या सरसावल्या
निवडणुकीसाठी मनसेचा ‘डिजिटल राजमार्ग’, राज ठाकरेंच्या विचारांना follow करण्याचं आवाहन
Raju Shetti Swabhimani Shetkari Sanghtana sugarcane rate council will held tomorrow at Jayasinghpur