अकोला : अवकाळी, गारपिट आणि त्यानंतरच्या ढगाळ वातावरणामुळे केळीच्या बागांना करप्या रोगाने घेरले होते. हे कमी म्हणून की काय (Banana Rate) केळीचे दरही 4oo ते 500 रुपये क्विंटलवर येऊन ठेपले होते. त्यामुळे दुष्काळात तेरावा अशीच काहीशी अवस्था केळी उत्पादकांची झाली होती. मात्र, महिन्याभरापासून वातावरण निवळले आहे तर दुसरीकडे (Temperature) तापमानात वाढ होत असल्याने केळीची मागणीही वाढली आहे. यामुळे दरवाढ होणार हे निश्चित होते पण हंगामाच्या सुरवातीलाच अपेक्षांपेक्षा अधिकची दरवाढ ही झाली आहे. अकोलामध्ये केळीला 1100 रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. एवढेच नाही तर ज्या ठिकाणी केळी बहरली त्याच वावरामध्ये आता काटाही होत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतूकीचा खर्च वाचलेला आहे. त्यामुळे वर्षभर केलेल्या परिश्रमाचे आणि खर्चाचे यंदा चीज होणार असेच वातावरण केळी उत्पादक प्रांतामध्ये आहे. अकोला बरोबरच (Khandesh)खानदेशातही केळीचे दरही सुधारत आहेत.
केळीचे दर वाढण्याला दोन महत्वाच्या गोष्टी कारणीभूत ठरलेल्या आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीपासूनच उन्हामध्ये वाढ होत आहे. मध्यंतरीच्या कडाकाच्या थंडीत केळी मागणीत घट झाली होती. पण दरात वाढ होणार याची खात्री शेतकऱ्यांना होती. यातच आंध्रप्रदेशातील केळीचे उत्पादन घटले आहे. निसर्गाच्या लहरीचा परिणाम येथील उत्पादनावर झालेला आहे. त्यामुळे परराज्यातून होणार आवक ही ठप्प आहे. परिणामी खानदेश आणि अकोला जिल्ह्यातील केळीची मागणी वाढली आहे. महिन्याभरापूर्वी केळीचे दर 400 ते 500 क्विंटलवर होते. दुपटीने वाढ झाल्याने शेतकऱ्यांचा आनंद गगणात मावेना झाला आहे.
प्रतिकूल परस्थिती आणि करपा रोगाचा झालेला प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांना होती. पण या संकटावर शेतकऱ्यांनी मात केली आहे. आता सर्वकाही पोषक वातावरण झाले असून केळी खरेदीसाठी व्यापारी हे थेट बांधावर पोहचत आहेत. शिवाय ठरलेल्या सौद्यांपेक्षा अधिकच्या किंमतीमध्ये केळी खरेदीची तयारी व्यापारी दर्शवत आहेत. सर्वकाही शेतकऱ्यांच्या मनासारखे होत असून गेल्या तीन-चार वर्षात जो दर मिळाला नाही तो यंदा बांधावर मिळत आहे. शिवाय यामध्ये अजून वाढ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
केळीची सर्वाधिक लागवड ही खानदेशात आहे. येथील बाजारपेठेत दिवासाकाठी 150 ट्रकच्या माध्यमातून 16 टन केळीची आवक होत आहे. सध्या केळीला मागणी आहे पण आवक कमी होत असल्याचे चित्र आहे. वाढीव दराचा फायदा खानदेशासह अकोला जिल्ह्यातील अकोट तालुका तसेच सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेल्या हजारो हेक्टरातील शेतकऱ्यांना होत आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा धार्मिक कार्यक्रस सुरु झाल्यास अणखीन दरात वाढ होईल अशी अपेक्षा आहे.
Photo : पपईची काढणी नव्हे तर रोटाव्हेटरने मोडणी, शेतकरी हताश
फेब्रुवारी महिन्यात ‘या’ पिकांची लागवड करा अन् भरघोस उत्पादन मिळवा, काय आहे शास्त्रज्ञांचा सल्ला?