वर्धा : (Cotton Season) कापूस हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी या पिकाचा बाजारपेठेत दरारा कायम आहे. हंगामाच्या सुरवातीपासून वाढत असलेले (Cotton Rate) दर आता अंतिम टप्प्यात वाढतच आहेत. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक दर हा (Selu Market) सेलू बाजार समितीमध्ये मिळाला आहे. मुख्य कापसाची काढणी झाली असून सध्याचे उत्पादन हे फरदडचे आहे. फरदड कापूस कालावधी झाला की बांधावर टाकून दिला जातो त्याच फरदड कापसाला यंदा प्रति क्विंटल 14 हजार 365 असा विक्रमी दर मिळाला आहे. एका शेतकऱ्याने 15 क्विटंल कापूस बाजारपेठेत आणला होता तर त्याची पट्टी ही 2 लाख 15 हजार 475 एवढी झाली होती. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली असली तरी वाढीव दरामुळे बळीराजा समाधानी आहे.
उत्पादनात घट झाल्यामुळे कापसाचे दरात वाढ होणार हे निश्चित होते. त्यामुळेच शेतकऱ्यांनी कापूस विक्रीपेक्षा साठवणूकीवर भर दिला होता. याच निर्णयाचा फायदा सबंध हंगामात शेतकऱ्यांना झाला आहे. संपूर्ण हंगामात कापसाचे एकदाही दर घसरले नाहीत. उलट यामध्ये वाढच होत गेली आहे. 7 हजार रुपये क्विंटलने झालेली सुरवात आज 14 हजार 300 रुपयांवर य़ेऊन ठेपली आहे. कापसाला विक्रमी दर यंदा मिळाला आहे. असे असताना अजूनही मागणी कायम आहे. मात्र, शेतकऱ्यांकडील कापूसही आता अंतिम टप्प्यात आहे.
दिवसेंदिवस कापसाच्या दरात वाढ होत गेली आहे. यापूर्वी पश्चिम विदर्भातील अकोट बाजारसमितीमध्ये 13 हजार 500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता. वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील बाजारसमितीमध्ये दराचे सर्व विक्रम मोडले आहेत. या बाजार समितीमध्ये तरोडा येथील साधना सुनील लांडगे यांनी 15 क्विटंल कापूस आणला होता. या बदल्यात त्यांना 2 लाख 15 हजार 475 एवढ्या रकमेची पट्टी मिळाली आहे. त्यांच्या कापसाला तब्बल 14 हजार 365 रुपये असा प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
केवळ मराठवाड्यतीलच नव्हे तर राज्यातीलच कापसाच्या क्षेत्रात घट झाली होती. घटते दर आणि बोंडअळीमुळे होणारे नुकसान यामुळे शेतकरी सोयबीन किंवा इतर पिकांनाच प्राधान्य देत होते. पण यंदाच्या विक्रमी दरामुळे चित्र बदलेल असा अंदाज कृषी विभागाने वर्तवलेला आहे. कापसाचे बियाणे वेळेपूर्वी मिळाले तर शेतकरी लागलीच कापसाची लागवड करेल त्यामुळे बियाणे पुरवण्याचे वेळापत्रकच कृषी विभागाने तयार केले आहे. यंदाच्या विक्रमी दराचा परिणाम या खरिपातील लागवडीवर होणार हे नक्की.