गोंदिया : गेल्या आठ दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाचे पुनरागमनास सुरवात झाली आहे. यावळी पाऊस कोकणातून नाही तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातून राज्यभर सक्रीय होत आहे. आठ दिवस उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी शेती कामे उरकली पण आता पावसामध्ये सातत्य राहिले तर खरीप पिकांचे नुकसान अटळ आहे. जुलै महिन्यापाठोपाठ ऑगस्टमध्येही पावसात सातत्य राहिले होते. पण ऑगस्ट दुसऱ्या आठवड्यात उघडीप दिलेला पाऊस पुन्हा सक्रिय होत आहे. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात तर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर दुसरीकडे नंदुरबारमध्ये सोमवारी पहाटेपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची धांदल उडाली असून आता पुन्हा खरिपातील पिके कशी जोपासावीत असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे पाणीपातळीत तर वाढ झालीच आहे पण वर्षभरातील पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मर्गी लागला आहे. असे असले तरी दुसरीकडे धरणातील वाढत्या पाणीपातळीमुळे पिकांसह नागरिकांनाही धोका निर्माण झाला आहे. गेल्या 36 तासांपासून जिल्ह्यातील काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी संततधार हा सुरुच आहे. शिवाय हवामान विभागाने गोंदिया जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी केल्याने पावसाचा मुक्काम वाढणार की काय अशी शंका आता उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील सर्व जलाशये ही तु़डूंब भरलेले आहेत. आता पावसामध्ये सातत्य राहिले तर धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
गोंदिया जिल्ह्यात पावसामुळे अनेक मार्गावर पाणी असून काही रस्ते ही बंद झाले आहेत. दुसरीकड़े आमगाव तालुक्यातील नदी काठच्या गावातील लोकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले असून सध्या आमगाव नगर परीषद क्षेत्रातील बंनगाव येथील 40 लोकांचे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवारा देण्यात आला आहे. बागनदी काठच्या मोहन टोला , महारी टोला येथील नागरिकांना हलविण्याचे प्रशासन प्रयत्न करीत आहेत.
सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाचा सर्वाधिक परिणाम हा खरीप हंगामातील पिकांवर झालेला आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने हजेरी लावल्याने पिकांची वाढ तर खुंटलेली आहेच पण आताच्या पावसामुळे थेट उत्पादनावर परिणाम होणार आहे. हंगामाच्या सुरवातीला पेरणी झालेल्या पिकांना अधिकचा धोका आहे तर उशीरा पेर झालेल्या पिकांसाठी हा पाऊस पोषक मानला जात आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे सलग तिसऱ्या वर्षी खरीप हंगाम अडचणीत आहे.