हिंगोली : हंगाम सुरु होण्यापूर्वी सर्वकाही अलबेल असल्याचा दावा(Agricultural Department) कृषी विभाग आणि राज्य सरकारकडून केला जात असला तरी (Kharif Season) खरिपाचे वास्तव काही वेगळेच आहे. महागाईच्या झळा शेतकऱ्यांना बसू दिल्या जाणार नाहीत आणि उत्पादनवाढीसाठी सर्वकश प्रय़त्न केले जाणार असल्याचे आश्वासन दिले जाते पण प्रत्यक्षात महाबीज या कंपनीनेच (Soybean Seed) सोयाबीनच्या बियाणे दरात वाढ केली आहे. तर दुसरीकडे आता शेतकऱ्यांना डीएपी या खताबरोबर लिंकिंगमध्ये सल्फर सुद्धा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. हिंगोली बाजारपेठेत हा प्रकार आढळून आला असून आता विक्रेत्यांवर काय कारवाई होणार का हे पहावे लागणार आहे.
खरीप हंगाम आता तोंड़ावर आला आहे. पाऊस पडला की शेतकरी हे चाढ्यावर मूठ ही ठेवरणारच आहेत. पण त्यापूर्वीच विविध अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. खताच्या किंमतीमध्ये वाढ होणार नसल्याचे सांगण्यात आले होते पण प्रत्यक्षात 1 हजार 200 रुपयांचे डीएपी खत हे आता 1 हजार 350 वर गेले आहे तर डीएपी घेतलेल्या शेतकऱ्यांना लिकिंगमध्ये सल्फर सुध्दा खरेदी करणे बंधनकारक केले जात आहे. सल्फरसाठी शेतकऱ्यांना वेगळे असे 600 रुपये मोजावे लागत आहेत. तर हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी तर मनमानी दर हा विक्रेत्यांनीच ठरवलेला आहे.
स्थानिक बाजारपेठत कृषी विभागाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन होत नाही हे हिंगोली बाजारपेठेत उघड झाले आहे. खतासह बियाणांची अधिकच्या दराने तर विक्री होत आहेच शिवाय शेतकऱ्यांना डीएपी खताबरोबर इतर खतही खरेदी करावेल लागत आहे. डीएपी ची किंमत यंदा 1 हजार 200 रुपयावंरुन 1 हजार 350 रुपये झाली आहे. यामध्येच 1350 च्या डीएपीच्या बॅगवर 600 रुपयाचं सल्फरची खरेदी कृषि केंद्र चालकांनी बंधनकारक केलयय. तर कुठे 1 हजार 450 रुपयांना डीएपी विकले जात आहे.
शेतकऱ्यांना पेरणी पूर्वीच खताची आणि बियाणांची खरेदी करावी लागते. अजून बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी झाली नसली तरी पावसाच्या आगमनानंतर झुंबड पडणार आहे.त्यामुळे भविष्यात टंचाई भासू शकते या भीतीने शेतकरी आताच अधिकच्या दराने खरेदी करु लागला आहे. मागणीचे रूपांतर नफ्यात करून घेण्यासाठी विक्रेते नवीन किमती आकारून जुनी खते/बियाणे विक्री करत असल्याच प्रकार सुरु आहे. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्याला आता महागाईला सामोरे जावे लागत आहे.