नांदेड : असो बरकत (Kharif Sowing) धूळपेरणीला म्हणत शेतकऱ्यांनी पाऊस पडण्यापूर्वीच पेरणी केली. मात्र, वरुणराजाला काही बळीराजाची दया आली नाही. धूळपेरणी केलेली पिके आता धोक्यात आहेत. केवळ नांदेडच नाही तर सबंध (Marathwada) मराठवाड्यात पावसाने उघडीप दिलेली आहे. पण धूळपेरणी ही परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात अधिकच्या क्षेत्रावर झाली आहे. जमिनीतील ओलीमुळे पिकांची उगवण तर झाली आहे पण उगवल्या-उगवल्याच पिकांनी माना टाकल्या आहेत. आता उगवलेले पीक बहरावे यासाठी (Nanded Farmer) जिल्ह्यातील शेतकरी प्रत्येक पिकाला हाताने पाणी घालत आहे. चार दिवसांमध्ये वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली नाहीतर मात्र, पुन्हा एकदा चाढ्यावर मूठ ठेवावी लागणार हे निश्चित आहे. तर काही ठिकाणी उपलब्ध पाणीसाठ्याच्या जोरावर पिके जोपासली जात आहेत.
जून महिन्याच्या सुरवातीपासूनच पावसाने शेतकऱ्यांची निराशा केली आहे. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी धूळपेरणीचे धाडस केले पण आता पहिली पेरणी धोक्यात आली आहे. कारण मृग नक्षत्राचे 10 दिवस उलटून गेले तरी पावसाने उघडीपच दिलेली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे किमान या आठवड्यात तरी पाऊस हजेरी लावेल या आशेने शेतकरी आता प्रत्येक पिकाला पाणी घालत असल्याचे चित्र नांदेडात आहे.
गतवर्षी सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस आणि सातत्याने अवकाळीची हजेरी यामुळे जलसाठ्यांमध्ये पाणी शिल्लक होते. पण मध्यंतरीचा कडक उन्हाळा आणि आता पावसाने दिलेली ओढ यामुळे विहिर, बोअर यांनी देखील तळ गाठला आहे. भर पावसाळ्यात पाणीटंचाईच संकट ओढावले आहे. आता चार दिवसांमध्ये पावसाची कृपादृष्टी झाली तर ही धूळपेरीणीतील पिके तरणार आहेत अन्यथा पुन्हा पेरणी करावी लागणार आहे. धूपेरणीत अधिकतर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकरी 6 हजार रुपये खर्चून धूळपेरणी केली आहे. मशागतीपासून ते पेरणीपर्यंतची कामे ट्रॅक्टरच्या आधारे आणि वाढलेली महागाई यामुळे शेती खर्चही वाढला आहे. उत्पादन बेभरवश्याचे का असेना पण खर्च हा ठरलेला आहे. त्यामुळे पावसाने अशीच उघडीप दिली तर पुन्हा बियाणांचा खर्च आहेच. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची प्रतिक्षा करीत आहे.