पुणे : रब्बी हंगामापाठोपाठ आता उन्हाळी हंगामही संपल्यामध्येच जमा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या अनुशंगाने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या (Kharif Season) खरिपाला आता सुरवात आहे. खरीप हंगामावर निसर्गाच्या लहरीपणाचा धोका असला तरी (Kharif Production) उत्पादन आणि उत्पन्न या दोन्ही दृष्टीकोनातून हा हंगाम महत्वाचा आहे. विशेषत: यंदा (Cotton Crop) कापसाबाबत योग्य ते नियोजन केले जाणार असून हंगामपुर्व कापूस लागवडीला कृषी विभागाने परवानगीच दिलेली नाही. शिवाय कापसाचे बियाणे हे 1 जूनपासूनच विक्री केले जाणार असल्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 1 जूनलाच हे बियाणे बाजारात मिळणार आणि त्यानंतरच कापूस लागवड होणार आहे. देशातील विविध राज्यांमध्ये संबंधित कंपन्या ह्या केव्हाही बियाणे बाजारात आणू शकतात मात्र, महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र कापूस बियाणे पुरवठा’ हा कायदा असून याअंतर्गतच कापसाचे बियाणे विक्री करावे लागणार आहे.
म्हणून कृषी विभागाने घेतला निर्णय
गतवर्षीच्या खरिपातील कापसाला मिळालेल्या विक्रमी दरामुळे यंदा मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात देखील कापसाचे क्षेत्र वाढेल असा अंदाज आहे. पण हंगामपुर्व लागवड केल्यास बोंडअळीचा परिणाम हा इतर पिकांवरही होणार आहे. बोंडअळीमुळे केवळ कापसाचेच नुकसान होते असे नाही तर कापसाबरोबर इतर पिके आणि शेतजमिनीवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे या सर्व गोष्टी टाळण्यासाठी कृषी विभागाने 1 जून पासूनच राज्यात कापसाचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
कृषी विभागाच्या भूमिकेमुळेच बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी झाला
खरीप हंगामपुर्व कापसाची लागवड केली की त्याचा परिणाम हा इतर पिकांवर होत असत. शिवाय लागूनच हंगामातील पिके असल्याने बोंडअळीची साखळीच तुटत नव्हती. त्यामुळे बोंडअळीचा परिणाम हा इतर पिकांवर आणि शेत जमिनीवरही झाला होता. मात्र, 2018 पासून हंगामपुर्व कापूस लागवडीस परवानगीच न दिल्यामुळे बोंडअळीची साखळी तुटली होती. त्यामुळेच यंदा बोंडअळीचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात होता. त्यामुळेच यंदाही कृषी विभागाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच कापूस बियाणाची विक्री होणार आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
अधिकच्या उत्पादनासाठी परिणामांची पर्वा न करता अनेकजण हे हंगामपुर्व कापूस लागवड करीत असत. पण याचे परिणाम जाणवू लागल्याने आता शेतकरी शक्यतो हंगामपुर्व लागवड करीतच नाही. असे असले तरी यंदा उत्पादक कंपन्यांकडून वितरकांना 1 मे 10 मे दरम्यान पुरवठा होणार आहे. तर वितरकांकडून किरकोळ विक्रेत्यांना 15 मे पासून पुरवठा तर किरकोळ विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना हे बियाणे 1 जून पासून विकले जाणार आहे.