लासलगाव : यंदा शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका संपण्याचे नाव घेत नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्वकाही नुकसानीत आहे. यापूर्वी नाशिक जिल्ह्यात द्राक्षांच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी (Summer Onion) उन्हाळी कांद्यावर भर दिला आता अवकाळीने उसंत घेतली तर महावितरणने शेतकऱ्यांना असा काय ‘शॉक’ दिला आहे की, शेतकऱ्यांना थेट (Crop Damage) पिकांमध्ये नांगर घालून (Seasonable Crop) हंगामी पिकांचा विषयच मिटवून टाकण्याची नामुष्की ओढावली आहे. असाच प्रकार येवला तालुक्यातील मातुलठाण शिवारात घडला आहे. अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे कांद्याला पाणीच देणे शक्य होत नाही. शिवाय वाढत्या उन्हामुळे कांदा पिकांचे होत असलेले नुकसान बघवत नसल्याने श्रीराम आव्हाड यांनी 2 एकरावरील कांद्यावर नांगर फिरवला आहे.
अवकाळीचा सर्वाधिक फटका हा उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. याची भरपाई हंगामी पिकातून काढण्याच्या उद्देशाने यंदा उन्हाळी हंगामातील कांद्याची लागवड करण्यात आली होती. शिवाय सुरवातीला पोषक वातावरण आणि नियमित पाणी असल्याने वाढ जोमात झाली. पण गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु झाला आहे. कृषीपंपाची विद्युत पुरवठाच सुरळीत होत नाही. अनियमित विद्युत पुरवठा, रोहित्रामध्ये बिघाड यामुळे पाणी असूनही उपयोग काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे श्रीराम आव्हाड या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर कांदा पिकावर नांगर फिरवला आहे.
अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे कांदा पीक जोपासणे मुश्किल झाले होते तर दुसरीकडे बाजारपेठेतही कांद्याच्या दरात घसरण ही सुरुच आहे. त्यामुळे कांद्यावर अधिकचा खर्च करण्यापेक्षा खरीप हंगामात क्षेत्र वापरता येईल या उद्देशाने शेतकऱ्यांनी उभ्या पिकात नांगर घातला. सध्याच्या वाढत्या उन्हामध्ये पाणी मिळाले तरच पिक पदरी अशी अवस्था असताना कृषी पंपासाठी 4 तास तो ही अनियमित विद्युत पुरवठा यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.
कांदा पीक हे तसे दरातील लहरीपणामुळे ओळखले जाते. मात्र, पीक पदरी पडण्यापूर्वीच आव्हाड यांना 2 एकरामध्ये 1 लाख 35 हजार रुपये खर्च आला होता. पण नियमित पाणीच मिळाले नसल्याने कांदा पोसला गेला नाही. त्यामुळे काढणी, छाटणी यावर खर्च करण्यापेक्षा कांदा पिकाचीच मोडणी करण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यामुळे कधी आस्मानी तर कधी सुल्तानी संकटाचा सामना शेतकऱ्यांनाच करावाच लागतो.
Unseasonable Rain : मराठवाड्यावरही अवकाळीची अवकृपा, हंगामी पिकांचे नुकसान
Loan Waiver : ‘नाबार्ड’ चा धक्कादायक अहवाल, कर्जमाफीमुळेच शेतकरी कर्जबाजारी, नेमकी काय आहेत कारणे ?