वाशिम : शेतकरी आधीच संकटात असताना आता बियाणे कंपनींकडूनही फसवणूक होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. वाशिम जिल्ह्यातील आसरा पार्डी येथे शेतकऱ्यांनी फ्लावर, कोबीचं बियाणं आणलं. मात्र, त्याला फळच आलं नाही. आसरा पार्डीचे प्रयोगशील शेतकरी शिवाजी वानखेडे या शेतकऱ्याने आपल्या 2 एकर शेतात सकाटा या कंपनीच्या फ्लावर आणि पत्ता कोबीची लागवड केली. मात्र, अडीच महिने होऊनही रोपांना कोबीच आला नाही. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे.
VIDEO: वाशिममध्ये बियाणे कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक, अडीच महिने उलटूनही रोपांना कोबी-फ्लावर आलेच नाही@dadajibhuse @RajuShetti #Farmer #Farming #FraudSeed #Washim pic.twitter.com/8wFsSrh1cf
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) August 22, 2021
बियाणाबाबत शेतकऱ्यांनी बियाणे कंपनीशी संपर्कही केला. मात्र, कंपनीने शेतकऱ्यांना उडवा उडवीची उत्तरं दिली. तुमच्याकडून काय होते ते करा? असं मग्रुर उत्तर कंपनीकडून देण्यात आलं. त्यानंतर शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली. त्यामुळं आता लवकरात लवकर चौकशी करून संबंधित कंपनीवर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वाशिम तालुक्यातील आसरा पार्डी येथील शिवाजी वानखेडे यांच्याकडे 18 एकर शेती आहे. वानखेडे हे वर्षभर भाजीपाला शेती करतात. यंदा त्यांनी सकाटा या कंपनीची 1 एकर फ्लावर आणि 1 एकर पत्ता कोबीची लागवड केली. मागील 2 वर्षात कोरोनामुळे भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान झाल होतं. आता लॉकडाऊन कमी झाल्यामुळे त्यांना या फ्लावर आणि पत्ता कोबीमधून चांगल्या उत्पन्नाची आशा होती. मात्र, बियाणं बोगस निघाल्यानं लागवड खर्च तर वाया गेलाच शिवाय 4 लाख रुपये मिळणारं उत्पन्न मिळणार नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
तक्रार करुन 5 दिवस उलटूनही अद्यापही प्रशासनाचा कोणताही अधिकारी पाहणीसाठी शेतात आला नाही. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवाजी वानखेडे या शेतकऱ्याने केलीय.